Coronavirus : धैर्यवान अश्विनी पाटीलचा थरारक अनुभव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

आमच्या तांत्रिक, कौटूंबिक तसेच प्रशासकीय अडचणींमुळे आम्ही यापुर्वी भारतात येऊन शकलाे नाही. मी लवकरच मायदेशी आणि माझ्या साताऱ्यात पोहचेन असा विश्‍वास अश्‍विनी पाटीलने व्यक्त केला आहे.

सातारा : वूहानला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. या विळख्यात मी आणि माझ्यासह भारतातील सुमारे 70 जण अडकलो आहोत. भिती धास्ती तर वाटतच आहे परंतु कुटुंबीय, सासरची मंडळी आणि पतीचे येणारे संदेश धैर्य देत आहेत. भारत सरकार आम्हांला मायदेशी नेण्याची नक्कीच व्यवस्था करेल असा विश्‍वास मूळची साताऱ्यातील अश्‍विनी अविनाश पाटील हिने एका वाहिनीशी बोलताना व्यक्त केला.

अश्‍विनीने आज (सोमवार) सकाळी एका व्हिडिओच्या माध्यमातून भारत सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर दुपारी एका वृत्त वाहिनीस दिलेल्या मुलाखतीत तिने चीन आणि भारत सरकार कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात कोठेही कमतरता जाणवत नसल्याचे स्पष्ट केले. साधारणतः 25 मिनीटांच्या मुलाखतीत तिने वूहानमधील भयवाह परिस्थितीचे कथन केले परंतु त्यातूनही आम्ही सुरक्षित असल्याची खात्री दिली आहे. 

अश्‍विनी म्हणते सध्या वूहान पुर्णतः बंद आहे. येथील नागरीकांना रस्त्यावरुन वाहन चालवायाचे असले तरी चालकास सरकारची परवानगी घ्यावी लागत आहे. सर्व नागरीक भयभीत झाले आहेत. या व्हायरसमुळे नागरीक एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. एका ठिकाणी एकच सुपर मार्केट खूले असते. आम्हांला शक्‍यतो बाहेर पडू नका अशी सूचना सातत्याने दिली जाते. प्रत्येक अपार्टमेंटमध्ये पोलिस सहकार्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु मार्केटमधील एखादी वस्तु खरेदी करावयाची असल्यास आम्ही बाहेर पडलो तर ती मिळेलच याची खात्री नाही. त्याचे कारण म्हणजे येथे येणारे माल ट्रकही आता बंद झाले आहेत.

हेही वाचा :  आता साताऱ्यासाठी सचिन तेंडूलकर घेणार पुढाकार ?

माझे पती येथे नोकरीला आहेत. ते सध्या आजारी होते. ज्यावेळी भारत सरकारने विमान पाठविले होते, त्यावेळी पासपोर्टच्या तांत्रिक अडचणीमुळे मला भारतात येता आले नाही. त्याचबरोबर माझे पती पोलंडचे असल्याने त्यांच्याकडे भारतीय नागरीकत्व नसल्याने आम्ही वेगळ्याच अडचणीत सापडलो. त्याहूनही पत्नी म्हणून मी त्यांना आजारपणात एकटे सोडून भारतात परतणे माझ्या मनास पटले नाही. त्यामुळे मी येथेच त्यांच्याबरोबर राहिले. त्यांना आजारपणामुळे चालताही येत नव्हते. त्यांच्या उपचारासाठी आम्ही वूहानमध्ये प्रयत्न केले. परंतु येथे सध्या केवळ कोरोना व्हायरसवरच उपचार सुरु असल्याचे आम्हांला आरोग्य विभागाने स्पष्ट केले. आम्ही काही दिवस ऑनलाईन पद्धतीने उपचार घेत होतो. पोलंड सरकारला विनंती केल्यानंतर त्यांनी पतीस उपचारासाठी तेथे नेण्याची संमती दिली. त्यांना आता पोलंडला हलविण्यात आले आहे.

वाचा :  वाचनप्रेमींसाठी धक्कादायक बातमी; पुस्तकांचं गाव गुंडाळणार ?

माझे कुटुंब (माहेर) सातारामध्ये स्थायिक आहेत. माझ्या या अडचणीच्या काळात कुटुंब आणि मित्र परिवार मला दिलासा देत आहेत. तसेच माझे सासू आणि सासरे माझी ख्यालीखूशाली दूभाषांच्या माध्यमातून संदेशाद्वारे विचारात आहेत. भारतीय दूतवास आणि आम्ही संपर्कात आहोत. माझ्यासह सुमारे 70 नागरीकांनी मायदेशात आणण्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत. परंतु आमच्या तांत्रिक, कौटूंबिक तसेच प्रशासकीय अडचणींमुळे ते सध्या शक्‍य होत नाही. ज्या पद्धतीने चीन आणि भारताचे सरकार परिस्थिती हाताळात आहेत त्यावरुन मला पुर्ण खात्री आहे मी लवकरच मायदेशी आणि माझ्या साताऱ्यात पोहचेन असा विश्‍वास अश्‍विनीने व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashwini Patil Asks Indian Government To Help Evacuate From Vuhan