esakal | कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास थोरात का आहेत अनुत्सुक?
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thorat is Curious to  Accept the Guardianship of Kolhapur.gif

 ‘‘कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून आज माझे नाव जाहीर झाले असले तरी ही जबाबदारी स्वीकारायची की नाही हे मी मुख्यमंत्र्यांशी बोलून ठरवेन,’’ असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास थोरात का आहेत अनुत्सुक?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः  ‘‘कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून आज माझे नाव जाहीर झाले असले तरी ही जबाबदारी स्वीकारायची की नाही हे मी मुख्यमंत्र्यांशी बोलून ठरवेन,’’ असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘‘मी सध्या बाहेरगावी आहे. माझी कोल्हापूरची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याचे मला समजले. पण माझ्याकडे महसूल मंत्रिपदासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारू नये, असे मला वाटते. मात्र, मी यासंदर्भात पुढील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून घेईन. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या पालकमंत्र्यांच्या यादीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची नगरचे तर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची नियुक्ती केली आहे. 

हे पण वाचा -  भगवान झाला लॉर्ड, आनंदचा हॅप्पी आणि छाया बनली शॅडो... हे एकदा वाचाच 

थोरात यांच्या रूपाने कोल्हापूरचे पालकमंत्रिपद पुन्हा एकदा जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांकडे गेले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांपैकी तीन जिल्ह्यात त्याच जिल्ह्यातील मंत्र्यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली असताना कोल्हापुरात मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. 

हे पण वाचा -  म्हणून अशोक चव्हाण यांनी पदभार स्वीकारण्याआधी  केला या युवकाला फोन 

गेल्या २५ वर्षांत चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने एकमेव जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री झाले. हा अपवाद वगळता १९९५ पासून कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हे नेहमी बाहेरीच्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे सोपवले होते. ज्या पक्षाचे आमदार ज्या जिल्ह्यात जास्त त्या पक्षाच्या मंत्र्यांकडे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद असे समीकरण होते. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे चार तर राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांकडेच हे पद येईल अशी अपेक्षा होती. 

आतापर्यंतचे पालकमंत्री
१९९५ ते १९९९- रामदास कदम
१९९९ ते २००२ - स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम
२००२ ते २०१४ - हर्षवर्धन पाटील
२०१४ ते २०१९ - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

.... तर पी. एन. यांचा दबदबा वाढणार
जिल्ह्याचे पालकमंत्री पद महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वीकारल्यास जिल्ह्याच्या राजकारणातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचा दबदबा वाढणार आहे. श्री. थोरात व पी. एन. यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मंत्रीपद नाकारल्यानंतर नाराज झालेल्या पी. एन. यांची समजूत श्री. थोरात यांनीच काढली होती. या दोघात सलोख्याचे संबंध असल्याचा फायदा पी. एन. गटाला होणार आहे.