बाळासाहेब थोरातही म्हणतात, "मी पुन्हा येईन..'

आनंद गायकवाड
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनीही "मी पुन्हा येईन' असे म्हणत फडणवीस यांच्या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडविली. 

संगमनेर (नगर) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता. मात्र, निकालानंतर शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्याचे सगळे चित्रच बदलले. सध्या सोशल मीडियावर "मी पुन्हा येईन'चे "मीम्स' आणि "पोस्ट' धुमाकूळ घालत आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनीही "मी पुन्हा येईन' असे म्हणत फडणवीस यांच्या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडविली. 

हेही वाचा, "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; फडणवीसांसमोर घोषणाबाजी 

संगमनेरमध्ये आयोजित 42व्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचा समारोप शनिवारी (ता. 16) झाला. या वेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार थोरात यांच्या मिस्कील स्वभावाची झलक सर्वांना अनुभवास आली. 

हेही वाचा, उद्योजक हुंडेकरी यांना अपहरणकर्त्यांनी इथे सोडले 

आपल्या भाषणात थोरात म्हणाले, ""गेल्या 42 वर्षांत अनंत फंदी व्याख्यानमालेतील फार थोड्या व्याख्यानांना मी मुकलो असेन. संगमनेरच्या सांस्कृतिक विश्वातील हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा परिचय संगमनेरकरांना झाला. या महान व्यक्तिमत्त्वांनीही संगमनेरशी असणारी आपली ओळख कायम ठेवली.'' त्याच वेळी त्यांनी "या व्याख्यानांसाठी मी पुन्हा येईन.. पुन्हा पुन्हा येईन...' अशी मिस्कील टिप्पणी करीत फडणवीस यांना टोला लगावला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

हत्तीविषयी निष्कारण भीती 
दरम्यान, अनंत फंदी व्याख्यानमालेतील अखेरचे सातवे पुष्प हत्ती अभ्यासक व पत्रकार आनंद शिंदे यांनी गुंफले. "एक संवाद हत्तीशी' या विषयावर शिंदे यांनी हत्तीमध्ये असणाऱ्या तरल भावभावना उपस्थितांसमोर उलगडून दाखविल्या. ते म्हणाले, ""समृद्ध निसर्गाचे प्रतीक, निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हत्ती या प्राण्याची आपल्याकडे नकारात्मक बाजू मोठ्या प्रमाणात अधोरेखित झाल्याने, त्याच्याविषयी निष्कारण भीती निर्माण झाली.'' 

अनुभवविश्‍व समृद्ध होत गेले 
शिंदे म्हणाले, ""वृत्तपत्रासाठी "फोटो फीचर' करण्याकरिता 2012मध्ये केरळला गेलो होतो. नेहमीप्रमाणे कथकली किंवा कलारीपेटू या विषयावर काम करण्याऐवजी मार्गदर्शकाने "हत्ती' हा विषय सुचवला. डोळे, डोके, मेंदू, हृदय उघडे ठेवून या अजस्र प्राण्याच्या विश्वात, त्याच्या डोळ्यातून डोकावण्याची संधी मिळाली. सकारात्मक उद्देशाने "एलिफंट केअर सेंटर'मध्ये काम करण्यास सुरवात केली. त्यातून अनुभवविश्व अधिकाधिक समृद्ध होत गेले.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat says I will come again..