ऑफिसमधल्या मुलीने मागितली लिफ्ट आणि मग..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

प्रसन्ना हा नीलमनगर येथील काम संपवून दुचाकीवरून जिमसाठी निघाला होता. त्या वेळी सोबत काम करणाऱ्या मुलीने प्रसन्ना यास लिफ्ट मागितली. प्रसन्ना याने त्या मुलीला नीलमनगर परिसरातील कल्पनानगर येथे सोडले.

सोलापूर : कामावरच्या मुलीला लिफ्ट दिल्याने तरुणास मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कल्पना नगरात घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा - माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

मुलीच्या भावांनी पाहिले
प्रसन्ना गोविंदराज बेत (वय 20, रा. अ गोदूताई विडी घरकुल, कुंभारी, सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 9 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. प्रसन्ना हा नीलमनगर येथील काम संपवून दुचाकीवरून जिमसाठी निघाला होता. त्या वेळी सोबत काम करणाऱ्या मुलीने प्रसन्ना यास लिफ्ट मागितली. प्रसन्ना याने त्या मुलीला नीलमनगर परिसरातील कल्पनानगर येथे सोडले. त्या वेळी तिथे उभ्या असलेल्या त्या मुलीच्या दोन भावांनी प्रसन्ना यास पाहिले. त्याची दुचाकी अडविली. लिफ्ट का दिली म्हणून असे म्हणून प्रसन्ना यास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तुला खल्लास करतो, असे म्हणून दमदाटी केली. फोन करून दोन मित्रांना बोलावले. त्यापैकी एकाने रस्त्याच्या कडेला पडलेली फरशी उचलून प्रसन्नाच्या डोक्‍यात, खांद्यावर मारली. या घटनेत प्रसन्नाच्या सर्वांगाला मार लागला आहे. चक्कर येत असल्याने उपचार घेतल्यानंतर प्रसन्ना याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

हेही वाचा - रेल्वे रुळाजवळ सापडला स्वंयसेवकाचा मृतदेह

बांधकामावरून मोबाईल चोरी 
जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलजवळील होनमुटे यांच्या बांधकामावरून मोबाईल चोरीला गेला. ही घटना 9 जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. नंदकुमार प्रकाश वाघमारे (वय 29, रा. सैफुल रोड, राघवेंद्रनगर, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघमारे यांनी बांधकामाजवळील पत्राशेडच्या खोलीत मोबाईल चार्जिंगला लावला होता. चोरट्याने नऊ हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

हेही वाचा -  सुरक्षा रक्षकाने मुलीला दाखवले खाऊचे आमिष! अन्‌..

अपघातप्रकरणी गुन्हा दाखल 
सोलापूर-हैदराबाद रस्त्यावरील संगरी फाटा तांदूळवाडी येथे चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मण काशिनाथ दुनगे (रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस हवालदार विश्‍वजित हंचे यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 14 डिसेंबर रोजी घडली होती. भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील धनेश अशोक पैलवान (वय 28, रा. तांदूळवाडी, ता. दक्षिण सोलापूर) आणि धोंडीदेव भीमाशंकर बनसोडे (वय 28, रा. तांदूळवाडी, ता. दक्षिण सोलापूर) या दोघांचा मृत्यू झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating the young man