अरेच्चा ! कोल्हापुरातून भिकारी झाले गायब 

The beggar disappeared from Kolhapur
The beggar disappeared from Kolhapur

कोल्हापूर - धार्मिक स्थळांच्या दारात बसून किंवा कधीही कोठेही समोर येऊन हात पसरणाऱ्या भिकाऱ्यांवर चोरून भीक मागायची वेळ कोल्हापुरात आली आहे. तीन दिवसापासून कोल्हापुरातून भिकारी गायब अशीही स्थिती झाली आहे. भिकारी प्रतिबंधक कायद्यानुसार भीक मागणे हा गुन्हा आहे. त्यामुळे भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन, मार्गदर्शन करण्याची या कारवाई अंतर्गत तरतूद आहे. 

कोल्हापुरात विजापूरपासून भिकारी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गुरुवारी व्यापक मोहीम राबवून भिकाऱ्यांना ताब्यात घेतले गेले आहे. त्यांना न्यायालयाच्या आदेशावरून साताऱ्यातील निवारा (भिक्षेकरी स्वीकारगृह) केंद्रात ठेवले आहे. 

गुरुवार भिक्षेकऱ्यांचाच दिवस

गुरुवार हा कोल्हापुरात भिक्षेकऱ्यांचाच दिवस असतो. या दिवशी गुरुदेव दत्त कोणत्याही रूपात समोर येतात. भिक्षा मागतात त्यामुळे या दिवशी केलेले दान फळाला येते, अशी एक समजूत आहे. अर्थात खास दानासाठी असलेल्या गुरुवार या दिवसाची संधी भिकारीही घेतात. 

रेल्वेतून झुंडीच्या झुंडीने कोल्हापुरात

सकाळी मिरजेहून कोल्हापुरात पहिल्या येणाऱ्या रेल्वेने विजापूर, बागलकोट, निपाणी, चिक्‍कोडीपासूनचे भिकारी झुंडीच्या झुंडीने कोल्हापुरात येतात. पहिला टप्पा म्हणून सदर बाजाराजवळ एका चौकात एकत्र येतात व अक्षरशः शहराच्या या भागात या गटाने, त्या भागात या गटाने दुसऱ्या भागात जायचे, अशा स्वरूपाची विभागणी करून ते भीक मागायला सुरुवात करतात व संध्याकाळी पुन्हा रेल्वेनेच परत जातात. बहुतेक जण विनातिकीट प्रवास करतात. या दिवशी दत्त मंदिराच्या दारात तर छत्र्यांचा आडोसा करून भिकारी बसतात. दिवसभरात मिळालेली चिल्लर ठराविक दुकानदारांना देऊन त्याबदल्यात शंभर रुपयाच्या चिल्लरला 110 रुपये घेऊन त्यातही कमाईचा प्रयत्न करतात. 

भीक मागणे हा गुन्हा आहे. सगळेच भिकारी कामधंदा न करता फुकट दिवस निघावा म्हणून जरूर भीक मागत नाहीत. कारण त्यामागे खूप वेगळी परिस्थिती दडली आहे. काही जण कामधंदा न करता फुकटची कमाई म्हणून भीक मागणारेही आहेत. काही जण काखेत लहान मुलांना बांधून भावनात्मक पद्धतीने भीक मागणारे आहेत. काही भिकारी उर्मटही आहेत. कायद्यानुसार अशा अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाते व न्यायालयाच्या आदेशानुसार सातारा येथील भिक्षेकरी स्वीकारगृहात पाठवले जाते. 

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासाठी सातारा येथे भिक्षेकरी स्वीकारगृह आहे. तेथे या भिकाऱ्यांना न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार काही दिवस ठेवले जाते व त्यांचे समुपदेशन करून त्यांना सोडले जाते; पण परिस्थिती अशी की भिक्षेकरी गृहातून बाहेर पडलेल्या भिकाऱ्याला आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी पुन्हा भीक मागायचीच वेळ येते. 

कोल्हापुरात तीन दिवसांपूर्वी राबवलेल्या मोहिमेमुळे शहरातील भिकारी गायब आहेत. एसटी स्टॅंड परिसरात भीक मागणाऱ्या महिला तर लपून छपून भीक मागत आहेत. पोलिस गाडी दिसली, की आडोसा शोधत आहेत. गुरुवारी झालेल्या कारवाईत स्वाधार नगर परिसरातील अनेक कुष्ठरोगी सापडले आहेत. त्यांची रवानगी साताऱ्यातील भिक्षेकरी स्वीकारगृहात केली आहे. 

भिकाऱ्यांची मग्रुरी 
कोल्हापुरात रोज सकाळी शिळे अन्न मागत भीक मागणारे भिकारी आपल्या भागाचे हद्द ठरवून घेऊन येत होते. काही वर्षात अधिकारी यायचे बंद झाले आहेत. त्यामुळे शिळे अन्न जनावरांना घालण्याची पद्धत रूढ झाली आहे; मात्र याउलट एसटी स्टॅंड, अंबाबाई मंदिर, दत्त मंदिर, यल्लमा मंदिर, टेंबलाई मंदिर, बाबूजमाल दर्गा, शुक्रवारी सर्व मशिदी, रविवारी सर्व चर्च, भवानी मंडप, चित्रपटगृहांचा परिसर येथे झुंडीने बसून भीक मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काहींची परिस्थिती कणव येणारी आहे, तर काही भिकाऱ्यांची मग्रुरी संताप आणणारी आहे. 

"सावली'ची भिकारीमुक्त कोल्हापूर ही संकल्पना 
कोल्हापुरातही भुकेल्याला अन्न द्या पण पैशाच्या स्वरूपात भिक देऊ नका, असे आवाहन यापूर्वीच अनेक संस्थांनी केले आहे. भुकेलेल्यांना अन्न जरूर मिळाले पाहिजे, म्हणून अन्न एकत्रित करून रोज ठराविक वसाहतीत जाऊन वाटणारी रॉबिनहूड ही संस्था गरिबांना जेवण देत आहे. तर सावली या संस्थेने भिकारीमुक्त कोल्हापूर ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com