अंधारावर घाव घालून सविता बनली डॉक्टर

belgaum savita lakshman maddur doctor
belgaum savita lakshman maddur doctor

निपाणी : परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्य यामुळे यशाचे शिखर गाठता येते. त्यासाठी कोणताही पारंपारिक व्यवसाय, जात-पात आड येत नाही. स्मशानाची स्वच्छता करणाऱ्या बोरगाव येथील वड्डर कुटुंबातील मुलीने हे दाखवून दिले आहे. सविता लक्ष्‍मण वड्डर असे तिचे नाव असून बीएएमएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी संपादन करून स्मशानातील काळोखाला लख्ख प्रकाशित केले आहे. त्यामुळे तिचे बोरगावसह परिसरातून कौतूक होत आहे.

दगड फोडणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेल्या सविताचे प्राथमिक शिक्षण बोरगावात झाले. माध्यमिक शिक्षणासाठी इचलकरंजीला प्रवेश घेतला. कुटुंबातील हालाखीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून तिने नेटाने अभ्यास केल्याने दहावीत चांगल्या गुणांनी यश मिळवले. विज्ञान शाखेतून बारावीनंतर निपाणीतील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यासाठी मोठा आर्थिक भार कुटुंबीयांवर पडला. मात्र न डगमगता लक्ष्मण वड्डर यांनी आपल्या कन्येचे स्वप्न साकार करण्यासाठी दिवस-रात्र स्मशानभूमीच्या स्वच्छतेसह कष्टाची कामे केली. त्याची जाणीव असलेल्या सवितानेही अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यश मिळविले. आपल्या कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी तिने त्यातून इतर मुलींसमोर प्रेरणादायी काम केले आहे. परिणामी वड्डर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.


कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव

अलीकडच्या काळात अनेक श्रीमंत कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना नेहमी आई-वडिलांचा पाठिंबा व आर्थिक पाठबळ मिळते. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्याची जाणीव ठेवून तिने मिळविलेले यश अतुलनीय असेच आहे.

'परिस्थितीची जाणीव ठेवून निरंतरपणे अभ्यास केल्याने आपल्याला हे यश मिळाले आहे. समाजातील इतर मुलींनीही आपले ध्येय ठेवून अभ्यास करून ते गाठावे.'

-सविता वड्डर, बोरगाव

'मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी निरंतरपणे स्मशानाच्या स्वच्छतेची कामे केली. त्यामुळे आपण केलेल्या कष्टाचे चिज झाल्याने अभिमान वाटतो.'  

-लक्ष्‍मण वड्डर, बोरगाव

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com