भाजपने बोलावली उद्या मुंबईत बैठक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

- आमदारांना विश्‍वासात घेण्यासाठी पक्ष कार्यालयात तीन वाजताचा मुहूर्त 

सोलापूर : भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांना विश्‍वास नसतानाही भाजपने राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मागील पाच वर्षांत ज्या अजित पवारांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनाच सोबत घेऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कसा का असेना पण मी पुन्हा येईन हे खरे केलेले मुख्यमंत्री फडणवीस आता उद्या (रविवार) मुंबईतील पक्ष कार्यालयातील बैठकीत दुपारी तीन वाजता सर्व आमदारांसमवेत चर्चा करणार आहेत. 

हेही वाचा : अजित पवार देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या शिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याचा मुहूर्त नजीक आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीपासून अजित पवार अस्वस्थ होते. तत्कालीन भाजप सरकारने त्यांच्यावर विविध प्रकारच्या घोटाळ्याचे आरोपही केले. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बॅंकेतील 25 हजार कोटींचा घोटाळा या आरोपांचा त्यात समावेश होता. दरम्यान, त्यांना ईडीने नोटीस बजावली होती. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच कायम असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

हेही वाचा : अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार

मात्र, अजित पवारांनी 35 आमदारांचे समर्थन भाजपला देण्याचे मान्य केल्यानंतर तत्काळ राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शरद पवार यांच्या तुलनेत सर्वाधिक टीकेचे लक्ष झालेले अजित पवार आता भाजपसमवेत आल्याने भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांची गोची झाली. या पार्श्‍वभूमीवर आगामी राजकारणाची दिशा कशी असेल, अजित पवारांना सोबत घेण्याचे नेमके कारण काय, मंत्रिपदांची संधी कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांना मिळेल यासह अन्य मुद्‌द्‌यांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. विशेषत: भाजप आमदारांना विश्‍वासात घेणे हाच या बैठकीमागचा उद्देश असल्याचे समजते. 

आमदार सुभाष देशमुखांचे मुंबईत ठाण 
अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता संघर्षाचा पेच सोडविल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात देवेंद्र सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख शुक्रवारी (ता. 22) मुंबईत दाखल झाले होते. शनिवारी (ता. 23) सुभाष देशमुख हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत होते. सत्ता संघर्षाचा पेच सुटेल अशी खात्री झाल्याने पक्षाने काही नेत्यांना शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत बोलावल्याची चर्चा आहे. उद्या (रविवार) होणाऱ्या बैठकीची उत्सुकता लागली आहे.

-

राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. उद्या (रविवार) मुंबईतील पक्ष कार्यालयात दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे. त्यानुसार आम्हाला आमंत्रण मिळाले आहे. 
- विजयकुमार देशमुख, भाजप आमदार, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP call all mla meeting tomorrow in Mumbai