इतिहासात भाजपचे प्रथमच स्वतंत्र पॅनेल; काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी ‘जत’ ठरणार कळीचा मुद्दा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इतिहासात भाजपचे प्रथमच स्वतंत्र पॅनेल

निवडणुकांसाठी या निवडणुकीचा पक्ष म्हणून विस्तारासाठी नक्की फायदा होणार आहे.

इतिहासात भाजपचे प्रथमच स्वतंत्र पॅनेल

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांच्या धक्कादायक माघारीनंतर भाजपने १६ जागांवर पॅनेल उभे केले आहे. हे पॅनेल किती मजबूत याबद्दल प्रश्‍न उपस्थित होतील. मात्र एक निश्‍चित की एखाद्या पक्षाने स्वतंत्रपणे जिल्हा बँकेत उतरण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर नसली भाजपने पक्ष म्हणून या निवडणुकीत आव्हान दिले आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील पूर्वेइतिहासा प्रमाणे इथेही या पॅनेलला बीजेपी की जेजेपी म्हणायचे अशा शंका उपस्थित केल्या जात असातानाही ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. भाजपसाठी आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांसाठी या निवडणुकीचा पक्ष म्हणून विस्तारासाठी नक्की फायदा होणार आहे.

भाजपला या निवडणुकीपूर्वी अनेक धक्के बसले आहेत. त्यामुळे भाजप जोरदार टक्कर देणार की लुटुपुटुची लढाई लढणार याची उत्सुकता आहे. अर्थात काही ठिकाणी मात्र भाजपा उमेदवारांना जोरदार टक्कर द्यावी लागणार आहे. जयंतरावांनी बिनविरोध चर्चेचे गुऱ्हाळ सुरू केल्यानंतर भाजपला काही जागा देत गुंडाळणार अशीच चर्चा होती. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष पेटल्यामुळे निवडणुकीत सर्वजण एकत्रित येण्याची शक्यता मावळली. तरीही राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात भाजपला दोन जागांचा प्रस्ताव दिला. तो मान्य झाला नाही. तशातच कवठेमहांकाळ सोसायटी गटाची जागा शिवसेनेला दिली. खासदार पाटील यांना तेथून उमेदवारी हवी होती. तेथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतांची गोळाबेरीज जास्त होती. त्यामुळे संजयकाकांनी निर्णायक क्षणी माघार घेतली. हा निर्णय सर्वांनाच धक्कादायक होता.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : 'रझा अकादमीसह अन्य घटकांचा करणार तपास', गृहमंत्र्यांची माहिती

बँकेच्या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व खासदार आणि बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडेच होते. परंतु त्यांच्या माघारीमुळे एकाकीपणे लढण्याची वेळ भाजपवर आली आहे. जिल्हा बँकेची मागील निवडणूक सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या दोन पॅनेलमध्ये झाली. त्यानंतर भाजपने सत्ताधाऱ्यांसोबत राहुन कारभार सांभाळला. परंतु आता बँकेची निवडणूक पहिल्यांदाच स्वतंत्रपणे लढण्याची वेळ भाजपवर आली आहे. महाआघाडीतील राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांचे प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. एकप्रकारे त्यांनी विजयी सलामीच दिली आहे. आता २१ पैकी उर्वरित १८ जागांसाठी निवडणूक लागली आहे.

भाजपने १६ जागांवर शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून उमेदवार उभे केलेत. आणखी दोन उमेदवार घेऊन १८ जागांवर लढत द्यावी लागणार आहे. मात्र भाजपच्या पॅनेलमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीचे प्रकाश जमदाडे यांना मिळालेले स्थान राष्ट्रवादीबाबत संशयाचे वातावरण निर्माण करणारे ठरले आहे. जतमधील ही लढत जिंकली तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आघाडीला सुरुंग लागू शकतो याची पक्की जाणीव भाजपच्या नेत्यांना आहे. त्यामुळे भाजपच्या पुढच्या जिल्हा व्यापी राजकारणासाठी जतची जागा निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा: सोनू सूदची बहीण लढणार पंजाब विधानसभेची निवडणूक; पक्ष कोणता?

loading image
go to top