माढ्यात भाजपची ताकद क्षीण... हे आहे कारण 

माढ्यात भाजपची ताकद क्षीण... हे आहे कारण 

माढा (जि. सोलापूर) : माजी आमदार ऍड. धनाजीराव साठे यांनी भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने माढा तालुका, माढा विधानसभा मतदारसंघ व करमाळा विधानसभा मतदारसंघातही भारतीय जनता पक्षाची ताकद क्षीण होणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीत माढा तालुक्‍यातील दिग्गज नेते असल्याने तालुक्‍यात मातब्बर विरोधकच नसल्याचे चित्र राजकीय पटलावर दिसत आहे. 

2014च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने डावलल्याने कॉंग्रेसपासून फारकत घेत भाजपशी घरोबा केलेल्या माजी आमदार धनाजीराव साठे यांनी गुरुवारी (ता. 16) पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ऍड. साठे यांच्या कॉंग्रेस पक्ष प्रवेशामुळे माढा विधानसभा, करमाळा विधानसभा व माढा तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय समीकरण व गणिते बदलणार आहेत. माढा विधानसभा मतदारसंघात ऍड. साठे व मोहिते-पाटील यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला चांगले बळ मिळाले होते. परंतु ऍड. साठे यांनी भाजपपासून फारकत घेतल्याने भाजपची माढा विधानसभा मतदारसंघातील ताकद अतिशय कमी झाली आहे. तसेच भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय कोकाटे हे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहिले होते. आता माढा तालुक्‍यात भाजपला चेहरा उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपला माढा विधानसभा मतदारसंघात, माढा तालुक्‍यामध्ये पुन्हा आपले बस्तान बसवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार असून एखादा मातब्बर नेता भाजपच्या गळाला लागण्याची गरज आहे. अन्यथा भाजपची माढा मतदारसंघात कमी ताकद दिसून येणार आहे. आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्‍यातील माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावांतूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसला मताधिक्‍य मिळाल्याने भाजपला आगामी काळात माढा तालुक्‍यात व माढा विधानसभा मतदारसंघात मोठा राजकीय संघर्ष करावा लागणार आहे. अर्थात हा संघर्ष करण्यासाठी सुद्धा भाजपकडे मातब्बर नेतेमंडळींचा अभाव दिसून येतो आहे. 

दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांची राज्यात महाविकास आघाडी झाल्याने माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या जोडीला आता ऍड. साठे यांची ताकद महाविकास आघाडीला मिळालेले आहे. माढा विधानसभा मतदारसंघ, माढा तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्था व करमाळा विधानसभा मतदारसंघातही माजी आमदार धनाजीराव साठे यांचा प्रभाव आहे. माढा नगरपंचायतीमध्ये ऍड. साठे गटाची सत्ता होती. ऍड. साठे यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे माढा नगरपंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात गेली आहे. याशिवाय शिवसेनेमध्ये झालेल्या अलीकडच्या काळातील राजकीय हालचालींमुळे माढा तालुक्‍यातील जुने निष्ठावंत शिवसैनिक धनंजय डिकोळे यांना पुन्हा जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी मिळाली आहे. शिवसेनेचे उपनेते प्रा. तानाजीराव सावंत यांच्या गटातील शिवसेना नेत्यांकडेही शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी पुन्हा देण्यात आल्याने शिवसेनेने जिल्ह्यातला राजकीय समेट घालायचा प्रयत्न केला आहे. याचाही महाविकास आघाडीच्या राजकारणावर माढा विधानसभा मतदारसंघात व माढा तालुक्‍यातील राजकारणात सकारात्मक परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

शिवाय यावेळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बबनराव शिंदे हे सलग सहाव्यांदा विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यामुळे महाविकास आघाडीचा विचार करता आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार धनाजीराव साठे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत या तिघांच्या राजकीय ताकदीची गोळाबेरीज केल्यास यापुढील काळात भाजपला माढा विधानसभा मतदारसंघात व माढा तालुक्‍यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अस्तित्वासाठी मोठा राजकीय संघर्ष करावा लागणार आहे. 

महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com