या गावातील मुलांना मिळेनात मुली ; पालक हैराण 

चेतन लक्‍केबैलकर 
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

"गावात कसलीच सोय ना. धड रस्तो ना. लाईट ना. म्हणून आमच्या पोरांक कोण पोरी देऊक तयार ना. गावात चड पोरांची लग्न होऊचे असंत. सरकाराक सांगोन कळतले काय हे?' भीमगड अभयारण्यातील एका गावातील एकजण "सकाळ'ला सांगत होता.

खानापूर : "गावात कसलीच सोय ना. धड रस्तो ना. लाईट ना. म्हणून आमच्या पोरांक कोण पोरी देऊक तयार ना. गावात चड पोरांची लग्न होऊचे असंत. सरकाराक सांगोन कळतले काय हे?' भीमगड अभयारण्यातील एका गावातील एकजण "सकाळ'ला सांगत होता. गावात 27 तरुण लग्नाळू आहेत. त्यातील दहा जणांनी तिशी ओलांडली आहे. गावात कोणत्याच सुविधा नसल्याने मुली दिल्या जात नसल्याची नवीच समस्या या गावांमध्ये निर्माण झाली आहे. 

हे पण वाचा - त्यावेळी मीच तुमचा मंत्री होतो... शरद पवार यांनी जागविल्या त्या आठवणी

भीमगड अभयारण्यात 13 गावांचा समावेश आहे. एकाही गावाला पक्का रस्ता नाही. नदी-नाल्यांवर पूल नाहीत. कोणत्याच मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. दरवर्षी या भागातील लोक आपल्या समस्या सरकारदरबारी मांडतात. पण, त्याचा काही उपयोग होत नाही. एका केंद्रीय अधिकाऱ्याने नुकतीच भीमगड अभयारण्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी स्थानिकांना स्थलांतर करण्याबाबत सुचविले. मात्र, समस्या सोडविण्यापेक्षा स्थलांतराचा उतारा देऊन पळवाट काढली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पण, नाईलाजास्तव स्थानिकांचा स्थलांतराकडे कल वाढत आहे. 
कोंगळा गावातील सुर्यकांत गावकर म्हणाले, ""स्थानिक लोक निसर्गाशी एकरूप झालेले आहेत. त्यांची वेगळी संस्कृती आहे. ते शहरांशी जुळवून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे, स्थलांतर हा पर्याय होऊ शकत नाही.'' गवाळीतील कृष्णा गावकर म्हणतात, सुविधा नसल्याने मुलांची लग्ने जमेनात म्हणून गाव सोडून जात आहेत. नुकताच गावातल्या चार कुटुंबांनी खानापूरजवळ जागा घेतली. घरे बांधायची ऐपत नसली तरी जागा दाखवून पोरांची लग्न उरकता येतील असे त्यांना वाटते. मात्र, जागा घेण्याची ऐपत नसलेल्यांची परवड सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. 

हे पण वाचा - बेळगावातील बेरोजगारांना रोजगाराची सुवर्ण संधी; येथे मिळणार रोजगार

अभयारण्यासह पश्‍चिम घाटातील अनेक गावांत हीच स्थिती आहे. तरुण गोव्यात गवंडी काम करतात. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेती बंद झाली आहे. एकट्या गवाळीत 200 एकर शेतजमीन पडीक बनली आहे. मुलभूत सुविधा व वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची योग्य भरपाई मिळाल्यास कुणीच गाव सोडणार नाही. पण, सरकारकडून याची दखल कधी घेतली जाणार की नाही, असा प्रश्न आहे. सध्या गवाळी रस्त्यावरील दोन पुलांना मंजुरी मिळाली आहे. रस्ता झाल्यास थोडाफार दिलासा मिळेल. 

सोयी-सुविधांची वानवा असल्यामुळे या भागातील लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्थलांतराची तयारी असली तरी येथील लोक बाहेरच्या परिस्थितीशी जुळवून घेतील, याबाबत शंका आहे. त्यासाठी पायाभूत योजना आखणे हाच उपाय आहे. 
- शामराव जाधव, गवाळी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boys are not married in belgaum khanapur