प्रवासी क्षमतेची अट मागे ; महामंडळांनी दिली परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

पूर्ण क्षमतेने बससेवा सुरु होत असल्याने आठवडाभरात त्यास प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता आहे.

बेळगाव : परिवहन मंडळाच्या बसेस यापुढे पूर्ण क्षमतेने धावणार आहेत. केंद्र सरकारने अन्‌लॉक ४.० ची घोषणा केल्यानंतर परिवहन महामंडळांनी केलेल्या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासनाने प्रवासी क्षमतेची अट मागे घेतली असून पूर्ण क्षमतेने बसेस सोडण्यास महामंडळांना परवानगी दिली आहे.

हेही वाचा - कौतुकास्पद... या गावात लोकवर्गणीतून उभारणार कोविड सेंटर

राज्यात केएसआरटीसीसह बीएमटीसी, वायव्य आणि ईशान्य अशी चार परिवहन महामंडळे आहेत. हुबळी आणि बेळगावसह सात जिल्ह्यांना वायव्य परिवहनकडून बससेवा दिली जाते. लॉकडाउनच्या काळात २१ मार्च ते १९ मेपर्यंत राज्यातील परिवहन सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर आंतरराज्य सेवा वगळता जिल्ह्याअंतर्गत प्रवासासाठी परिवहन सेवा सुरु केली होती. पण, सोशल डिस्टन्सिंग सक्तीचे केले आहे. 

बसमध्ये ४८ ते ५२ आसनक्षमता असतानाही केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य शासनाने ३० प्रवासी क्षमतेची अट घातली होती. यामुळे आधीच लॉकडाउन काळात बसेस बंद राहिल्याने आर्थिक डबघाईला आलेल्या परिवहन संस्थेला परिवहन सेवा सुरू होऊनही कोणताच फायदा झाला नव्हता. याउलट कमी प्रवासी संख्येमुळे इंधनाचाच अधिक खर्च सोसावा लागत होते.

हेही वाचा - कोरोना मृतदेहाची हेळसांड थांबणार, या शहराला दोन शववाहिका

त्यासाठी वायव्यसह राज्यातील इतर  तिन्ही परिवहन महामंडळांनी शासनाशी पत्रव्यवहार करीत परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. 
मागील आठवड्यातच याबाबतचा पत्रव्यवहार झाला होता. त्याला राज्य शासनाने मान्यता दिली असून, १ सप्टेंबपपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. परिवहन मंडळाच्या सूत्रानुसार पूर्ण क्षमतेने बससेवा सुरु होत असल्याने आठवडाभरात त्यास प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the buses run full of travelers in belgaum government permit this decision