'केंब्रीज'च्या पालकांनी गाठले पाेलिस ठाणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

घरापासून दूर राहात असल्याने ही मुले येथील वातावरणाशी एकरूप झालेली नाहीत. त्यामुळे त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असावा, असे म्हणणे शाळेतर्फे मांडण्यात आले.

सातारा : भिलार (ता. महाबळेश्‍वर) येथील केंब्रीज हायस्कूलमधून पळून जाताना सापडलेल्या 11 मुलांची बालकल्याण समितीच्या सदस्यांकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान मुलांना झालेल्या त्रासाबद्दल पालकांनी तक्रार देण्यासाठी पाेलिस ठाणे गाठले आहे.

केंब्रीज हायस्कूलमधील 11 आदिवासी मुले शाळेतून पळून जात असल्याचे ग्रामस्थांना आढळले. चौकशीमध्ये ते शाळेतील त्रासाला कंटाळून पळून जात असल्याचे समोर आले हाेते.ग्रामस्थांनी मुलांना पाचगणी पोलिस ठाण्यात नेले हाेते. तेथे त्यांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर संबंधित मुलांना साताऱ्यातील निरीक्षण गृहात आणण्यात आले. तेथे बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ऍड. मनीषा बर्गे, सदस्या ऍड. माधुरी प्रभुणे, ऍड. सुधीर गोवेकर, ऍड. योगेंद्र सातपुते, दिप्ती कुलकर्णी यांनी संबंधित मुलांची चौकशी केली. मुलांशी केलेल्या चर्चेतून समोर आलेल्या बाबींनुसार या समितीचा अहवाल तयार झाला आहे. त्यांच्या निर्देशानूसार पाेलिस प्रशासन पूढील कारवाई करेल. दरम्यान काही पालकांनीही मुलांना झालेल्या त्रासाबद्दल तक्रार देण्यासाठी पाेलिस ठाणे गाठले आहे.

सध्या (दुपारी साडे तीन ) या प्रकरणातील पूढील कार्यवाही सुरु आहे.
 

काय घडले हाेते नेमके वाचा...

'केंब्रीज'चे विद्यार्थी शाळेतून पळाले; शिक्षकांचा त्रासाचा पोलिसांत दावा

पोलिसांनी सांगितले, की भिलार येथील केंब्रीज हायस्कूल या निवासी शाळेत शासनाच्या आदिवासी विभागाची 292 मुले शिक्षण घेत आहेत. मंगळवार ता. 11 राेजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भोसे खिंडीतून गावाच्या दिशेने काही मुले डोंगरातून पळत चालली होती. त्या वेळी गावातील अजित गोळे व कुलदीप गोळे हे घरासमोरच्या कट्ट्यावर बसले होते. घोळक्‍याने आलेली ही मुले पाहून अजित व कुलदीप याना शंका आली. त्यांनी या मुलांना थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु मुले भीतीने डोंगराच्या दिशेने पळू लागली. अजित व कुलदीपच्या मदतीला तुषार गोळे, लखन गोळे व युवती नेहा गोळे, अनुजा गोळे याही आल्या. यातील 11 मुलांना युवकांनी पकडले व त्यांच्याकडे विचारणा केली. त्या वेळी ही मुले ढसाढसा रडू लागली. आम्ही केंब्रीजचे विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी या मुलांना शाळेत पोचवण्याचा निर्णय घेतल्यावर मुले आणखीच भेदरली. "आम्हाला शाळेत न सोडता पोलिस ठाण्यात न्या. नाहीतर सरकारी अधिकाऱ्यांकडे न्या; पण आम्हाला त्या शाळेत नेऊ नका,' अशी विनवणी त्यांनी केली. त्यानंतर या युवकांनी मुलांना घेऊन भोसे खिंडीत आणले. त्या वेळी आणखी दोन मुले बसमध्ये बसून जात असल्याचे समजल्यावर युवकांनी बसमध्ये जाऊन त्यांना खाली उतरवले. अशी एकूण 13 मुले भोसेच्या युवकांनी पाचगणी पोलिस ठाण्यात आणली. आठ ते दहा वयोगटातील तब्बल 13 मुले पोलिस ठाण्यात आल्याने तेथेही खळबळ उडाली. पोलिस ठाण्यात आलेली ही मुले प्रचंड भेदरलेली होती. त्यांनी रडायला सुरुवात केली. रडतरडतच त्यांनी केंब्रीज शाळेतील शिक्षकांकडून त्रास होत असल्याचे सांगितले. आम्हाला शाळेत नियमितपणे मारहाण होत असल्याने आम्ही पळून जात असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या वर्गातील मुले आम्हाला मारहाण करतात. भिंतीवर डोके आपटतात, आम्हाला जेवण व्यवस्थित मिळत नाही, शाळेत तक्रार केल्यास शिक्षकही आम्हाला बांबूने मारहाण करतात, अशा तक्रारी या मुलांनी केल्या. आता तुम्ही जर आम्हाला पुन्हा शाळेत सोडले, तर तेथील शिक्षक पुन्हा आम्हाला मारतील, त्यापेक्षा आम्हाला सरकारच्या ताब्यात द्या.. आम्हाला घरी पाठवा. तिथला सारखा सारखा मार खाण्यापेक्षा आम्हाला घरी सोडा, असा पवित्राच या विद्यार्थ्यांनी घेतला. 
पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी तातडीने या मुलांचे जबाब नोंदवून घेतले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. घरापासून दूर राहात असल्याने ही मुले येथील वातावरणाशी एकरूप झालेली नाहीत. त्यामुळे त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असावा, असे म्हणणे शाळेतर्फे मांडण्यात आले. अखेर या मुलांना साताऱ्यातील बालकल्याण समितीसमोर नेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला हाेता.

वाचा : जय शिवराय ! अखेर शिवप्रेमींनी करुन दाखवलंच 

हेही वाचा : साताऱ्याचे 'हे' नेते चालले पुन्हा राष्ट्रवादीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cambridge High School Eniqury Completed By Bal Kalyan Committee