धक्कादायक : 'केंब्रीज'चे विद्यार्थी शाळेतून पळाले; शिक्षकांचा त्रासाचा पोलिसांत दावा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

सर्व मुलांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी मुलांचे जबाब नोंदविले. तसेच तातडीने या मुलांच्या अहवाल बाल संरक्षण अधिकारी सातारा यांना पाठवणार असल्याचे नमूद केले. 

भिलार (जि. सातारा) : भिलार येथील केंब्रीज हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेले आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शाळेतून धूम ठाेकली. सुमारे एक किलाेमीटर अंतर पार केल्यानंतर विद्यार्थ्यांनी भोसे गावाच्या डोंगरात प्रवेश केला. या ठिकाणी असलेल्या युवकांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. परंतु प्रथमतः त्यांनी टाळाटाळ केली. सर्व मुलांना पाेलिसांत नेल्यानंतर क्षणांतच रडत रडत आम्हांला शाळेत त्रास दिला जात असल्याने आम्ही पळून आलाे आहाेत असे पाेलिसांना सांगितले. 

याबाबत अधिक माहिती पाेलिसांकडून मिळाली. पाेलिसांनी सांगितले की भिलार येथील एका केंब्रीज हायस्कूल या निवासी शाळेत शासनाच्या आदिवासी विभागाची 292 मुले शिक्षण घेत आहेत. आज (मंगळवार) सायंकाळी भोसे खिंडीतून गावाच्या दिशेने काही मुले डोंगरातून पळत चालली होती. यावेळी गावात अजित गोळे व कुलदीप गोळे हे घरासमोरच्या कट्ट्यावर बसले होते. यावेळी ही घोळक्‍याने आलेली मुले पाहून अजित व कुलदीप याना शंकास्पद वाटल्याने त्यांनी या मुलांना थांबवले परंतु ही मुले भीतीने डोंगराच्या दिशेने पळू लागली. अजित व कुलदीपच्या मदतीला तुषार गोळे, लखन गोळे व युवती नेहा गोळे, अनुजा गोळे हे आले. या सर्वांनी 11 मुलांना पकडले. त्यांची विचारणा केली. त्यावेळी सर्व मुले ढसाढसा रडू लागली. का पळून आले याचे कथन केले. त्यावेळी तुम्हांला पुन्हा शाळेत साेडताे असे सांगितल्यावर त्यांनी आम्हांला शाळेत न सोडता पोलीस ठाण्यात न्या अथवा सरकारी अधिकाऱ्यांकडे न्या, पण आम्हांला शाळेत नेऊ नका अशी विनवणी केली. त्यानंतर आणखी दाेन मुलांना देखील युवकांनी ताब्यात घेतले आणि पाेलिस ठाण्यात आणले.

सर्व मुले पोलीस ठाण्यात आली तेव्हा ती घाबरलेलीच हाेती. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी मुलांचे जबाब नोंदविले. आठ ते दहा वयोगटातील तब्बल 13 मुले असल्याने तातडीने या सर्वांचा अहवाल बालकल्याण समितीस पाठवणार असल्याचे श्री. बडवे यांनी नमूद केले.

दरम्यान, मुलांनी पाचगणी पोलिस ठाण्यात शाळेबाबत केलेल्या तक्रारीसंदर्भात शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सद्यस्थितीत (रात्री सव्वा दहा पर्यंत) काेणताच प्रतिसाद मिळाला नाही. 

हेही वाचा  सरकार कुठले यापेक्षा आमची सामूहिक एकी महत्वाची : एकनाथ शिंदे

वाचा साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना

हेही वाचा महिलेनेच काढला सरकारी महिला वकीलाचा काटा

वाचा  ...म्हणून वडिलांनी घातला मुलावर कुऱ्हाडीचा घाव

दरम्यान श्री. बडवे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. घरापासून दूर राहात असल्याने ही मुले येथील वातावरणाशी एकरूप झालेली नाहीत. त्यामुळे त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असावा, असे म्हणणे शाळेतर्फे पाेलिसांत मांडण्यात आले. अखेर या मुलांना साताऱ्यातील बालकल्याण समितीसमोर नेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students From Cambridge School Bhilar Ran Away