जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू | Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली जिल्हा बँक
सांगली : जिल्हा बँक निवडणूक

सांगली जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चिन्ह वाटपानंतर उमेदवारांनी प्रचार कार्यालये थाटून प्रचारास प्रारंभ केला आहे. देवाला साकडे घालून अनेकांनी प्रचाराचे नारळ फोडून मतदारांच्या भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. अनेकांनी पायाला भिंगरी लावली आहे. उमेदवार पॅनेलचा परंतु प्रचार स्वतंत्र असे चित्र पहिल्या टप्प्यात दिसून येत आहे. निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

जिल्हा बँक म्हणजे नेत्यांची बँक, असे समीकरण बनले आहे. त्यांचे बँकेत संचालक होण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही, असे चित्र गेल्या काही वर्षांत दिसून येते. बँकेचा गेल्या सहा वर्षांत झालेला कायापालट आणि वाढलेला नफा पाहून अनेकांना बँकेची भुरळ पडली आहे. त्यामुळे बँकेच्या इतिहासात प्रथमच मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अर्ज मागे घेण्यासाठी नेते मंडळींना मोठी कसरत करावी लागली. अर्ज माघारीनंतर तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर १८ जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्यासाठी ४६ उमेदवार रिंगणात आहे.

हेही वाचा: Pune : कर्मयोगी कारखाना पंचवार्षीक निवडणूकीचे बिगुल वाजलं

महाआघाडीच्या सहकार विकास पॅनेलमधून १८ उमेदवार तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलमधून १६ उमेदवार एकमेकाशी थेट लढत आहेत. त्याचबरोबर अन्य १२ उमेदवारही स्वतंत्रपणे लढत आहे. चिन्ह वाटप झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचार कार्यालये थाटून प्रचारास प्रारंभ केला आहे. सांगलीत काँग्रेसमधील तीन उमेदवारांनी स्वतंत्रपणे तीन कार्यालये थाटून तेथून प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात उमेदवार पॅनेलचा आणि प्रचार स्वत:चा असे चित्र दिसून येते. बँकेचे जिल्हा कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे वैयक्तिक भेटी-गाठीवर भर दिसून येते. मतदार याद्या घेऊन संपर्क साधून प्रचाराची गळ घातली आहे. या निमित्ताने मतदार ‘लाखमोला’चे ठरले आहेत.

‘क्रॉस व्होटिंग’चा मोठा धोका
बँकेच्या निवडणुकीत दोन स्वतंत्र पॅनेलमध्ये लढत होत आहे. काही गटात अपक्ष उभे आहेत. ‘क्रॉस व्होटिंग’चा मोठा धोका काही गटात आहे. त्यामुळे उमेदवारांनी कटाक्षाने सावध राहून प्रचारास सुरुवात केली आहे. बँकेत ‘एंट्री’ होऊ अशी प्रार्थनाही केली आहे. बँकेचे संचालक मंडळ २१ जणांचे असते. विद्यमान संचालक मंडळांपैकी तिघे बिनविरोध निवडून आलेत. मैदानात नऊ विद्यमान संचालक पुन्हा नशीब आजमावत आहेत. त्यापैकी किती जण निवडून येणार? नव्याने किती जण बँकेत येणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे.

loading image
go to top