#ThursdayMotivation : इथे मोफत शिकवतात चिनी भाषा! (व्हिडिओ)

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

चिनी भाषेत स्वर व व्यंजने मिळून 272 आहेत. त्यामुळे शिकण्यास तशी ही भाषा काहीशी अवघड आहे. परंतु, भाषेचे धडे देताना त्यात सुटसुटीतपणा आणला आहे.

सोलापूर : रोजगाराच्या संधी, व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनामुळे चिनी भाषेचा दबदबा वाढत आहे. चिनी भाषेचे नेमके हेच बलस्थान ओळखून सोलापुरात गेल्या 15 वर्षांपासून चिनी भाषेचे वर्ग सुरू आहेत.

आतापर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी या वर्गाच्या माध्यमातून चिनी भाषा अवगत केली आहे. भैय्या चौकातील डॉ. कोटणीस स्मारकामध्ये हे वर्ग चालतात. गुरुवारी (ता.10) डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची 109 वी जयंती. त्यानिमित्त या भाषा वर्गाविषयीचा हा विशेष वृत्तांत. 

चिनी भाषा शिकण्यासाठी सोलापुरातही तरुण उत्सुक असल्याचा अनुभव वर्ग आयोजकांना आला आहे. विशेष म्हणजे सोलापूरचे आंतरराष्ट्रीय मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या चीनमधील कार्याचाही भावनिक धागा हे वर्ग सुरू करण्यामागे आहे. त्यामुळेच या भाषा वर्गाचे नाव डॉ. कोटणीस एज्युकेशन स्टडी सर्कल असे ठेवण्यात आले.

चिनी भाषेत स्वर व व्यंजने मिळून 272 आहेत. त्यामुळे शिकण्यास तशी ही भाषा काहीशी अवघड आहे. परंतु, भाषेचे धडे देताना त्यात सुटसुटीतपणा आणला आहे. चिनी भाषेविषयी पुस्तकही तयार करण्यात आले आहे. चिनी भाषा शिकण्यासाठी डॉक्‍टर, अभियंते, शासकीय अधिकारी, शिक्षक, व्यावसायिक पुढे येत आहेत. काही जण उत्सुकता म्हणून या भाषेकडे वळत आहेत.

सर्कलचे अध्यक्ष रमेश मोहिते हे निवृत्त पोलिस उपअधीक्षक आहेत. मोहिते यांनाही चिनी भाषा अवगत आहे. तेही या प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतात. मोहिते यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात (सीबीआय) दिल्ली येथे काम केले आहे. आशिया खंडामध्ये भारताबरोबरच चीन आर्थिक सत्ता बनू पाहत असल्यामुळे जगभरच चिनी भाषा शिकण्याचा ओढा वाढत आहे. रोजगाराच्या संधी, व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनामुळेही चिनी भाषेचा दबदबा वाढत आहे. चिनी भाषेचे नेमके हेच बलस्थान ओळखून सोलापुरात गेल्या पंधरा वर्षांपासून चिनी भाषेचे वर्ग सुरू झाले आहेत. 

जागतिकीकरणामुळे चित्र पालटत आहे. चीनचा व्यापारातील वाटा मोठा आहे. त्यामुळे चीनशी व्यवहार करायचा तर ही भाषा शिकण्याची गरज आहे. त्यामुळे याविषयी जागृती निर्माण होण्यासाठी हे मोफत वर्ग सुरू केले आहेत. 
- रमेश मोहिते, अध्यक्ष, डॉ. कोटणीस स्टडी सर्कल 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- दिल्लीत लोकसंख्येच्या 88 टक्के लोकांमध्ये 'ड' जीवनसत्वाची कमी

- वृत्तपत्रांमध्ये बांधलेले खाद्यपदार्थ विषारी

- Vidhan Sabha 2019 : फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिला नाही: शहा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese language is being taught free of charge by the Dr Kotnis Memorial