शिवथाळी हवी दर्जेदार; जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

विनायक लांडे
बुधवार, 15 जानेवारी 2020

शिवभोजन केंद्रचालकांचा प्रदीर्घ प्रशिक्षण वर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. केंद्रचालकांना शिवभोजन योजनेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले.

नगर : ""गरिबांना अल्प दरात भोजन देण्यासाठी शहरात पाच शिवभोजन केंद्रांना मंजुरी दिली. सरकारची महत्त्वाकांक्षी योजना सुरळीत चालावी, यासाठी प्रशासनातर्फे वेळोवेळी शिवथाळीची तपासणी केली जाणार आहे. शिवभोजन केंद्रचालकांनी ग्राहकाला निश्‍चित करण्यात आलेल्या निकषानुसार उत्कृष्ट, दर्जेदार अन्न द्यावे, योग्य काम करणाऱ्यांचा प्रशासन सन्मानच करील; परंतु योजनेतील नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल,'' अशी तंबी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केंद्रचालकांना दिली.

अधिक माहितीसाठी-  वुई.. वुई... कापेऽऽऽ... 

शिवभोजन केंद्रचालकांचा प्रदीर्घ प्रशिक्षण वर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. केंद्रचालकांना शिवभोजन योजनेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले. नायब तहसीलदार अभिजित वांढेकर, पुरवठा निरीक्षक विजय उमाप, डॉ. दादासाहेब साळुंके, विक्रम म्हसे, किशोर देशमुख आदी उपस्थित होते. प्रशिक्षणात पाचही शिवभोजन केंद्रांच्या चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. 

योजनेसाठी समिती गठित

दरम्यान, नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागातर्फे शासन निर्णय जारी करण्यात आला. तातडीने योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनातर्फे राज्यभरातील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. योजनेसाठी समिती गठित करण्यात आली. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत.

क्‍लिक करा- कर्जमाफी प्रक्रियेत "ही' बॅंक आघाडीवर

पहिली पाच शिवभोजन केंद्रे नगरमध्येच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरिबांसाठी शिवभोजन योजना सुरू केली. नगर जिल्ह्याने योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात आघाडी घेतली आहे. राज्यातील पहिली पाच शिवभोजन केंद्रे नगरमध्येच सोमवारी (ता. 13) मंजूर झाली आहेत. यासाठी ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते केंद्रांचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector ordered that Shivathali should be quality