शिर्डी विमानतळात घुसले अतिरेकी!

डॅा. अरुण गव्हाणे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळाचा ताबा अतिरेक्‍यांनी घेतल्याची माहिती मिळते. काही वेळातच राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनएसजी) विमानतळावर दाखल होते.

पोहेगाव (शिर्डी) : दुपारचे चार वाजलेले. शिर्डी विमानतळात अतिरेकी घुसल्याची माहिती मिळताच, एकच धावपळ उडते. राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) पथक तातडीने हजर होते. पूर्ण विमानतळाचा ताबा हे पथक घेते. विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात येते. विमानतळावरील सर्व दिवे बंद होतात. अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू येऊ लागतात. अतिरेक्‍यांचा शोध सुरू होतो. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू असते.

काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळाचा ताबा अतिरेक्‍यांनी घेतल्याची माहिती मिळते. काही वेळातच राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनएसजी) विमानतळावर दाखल होते. सर्व कर्मचाऱ्यांना घाई गडबडीत बाहेर काढून संपूर्ण विमानतळ परिसराचा ताबा पथकातील दीडशे कमांडो घेतात.

बॉम्बपथक सज्ज

अतिरेक्‍यांचा शोध सुरू होतो. विमानतळावरील कानाकोपऱ्यात बॉम्बचा शोध घेतला जातो. बॉम्ब निकामी करण्यासाठी पथक सज्ज होते. अचानक गोळीबाराला सुरवात होते. त्याच्या आवाजाने सर्वांचीच पाचावर धारण बसते. विमानतळावरील सर्व दिवे बंद केल्याने नेमके काय सुरू आहे, हे लक्षात येत नाही.

हेही वाचा - टोलनाक्‍यावरील कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला

मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू

प्रत्येक घडामोडीवर "टीम'चे प्रमुख बारकाईने लक्ष ठेवून होते. सातत्याने सर्वांना गरजेप्रमाणे कारवाईबाबत सूचना करीत होते. राष्ट्रीय सुरक्षा पथकासह (एनएसजी) श्वानपथक, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक, बॉम्बशोधक पथक कामाला लागले होते. दुपारी चार वाजता सुरू झालेली मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

हेही वाचा - साईमंदिरातील व्यवस्थापनावर "रिसर्च'; धक्कादायक निष्कर्ष

सर्वांचाच जीव भांड्यात

अचानक काकडी येथे मोठ्या प्रमाणात फौजफाटा दाखल झाल्याने नेमके काय घडलेय, हे अनेकांना कळतच नाही. अखेर शिर्डी विमानतळावर अतिरेकी घुसल्यास त्यांचा बीमोड कसा करायचा, याची ही रंगीत असल्याचे समजते आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commando Squad's demonstration in shirdi airport