कॉंग्रेसचे ऑनलाईन शेतकरी क्रांती संमेलन; उद्या राज्यभरात थेट प्रक्षेपण 

बलराज पवार
Wednesday, 14 October 2020

केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने ऑनलाईन शेतकरी क्रांती संमेलन आयोजित केले आहे.

सांगली : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने ऑनलाईन शेतकरी क्रांती संमेलन आयोजित केले आहे. गुरुवारी (ता. 15) राज्यभरात या संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. 

श्री. कदम आणि श्री. पाटील म्हणाले की, शेतकरी क्रांती संमेलनाचे उद्‌घाटन संगमनेरला गुरुवारी दुपारी तीन वाजता होणार आहे. यावेळी राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे राज्यभर थेट प्रक्षेपण होणार आहे.

या कार्यक्रमापाठोपाठ कोल्हापूरमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी शहरे आणि तालुक्‍यातील 23 ठिकाणे निश्‍चित केली आहेत. सांगलीत मार्केट यार्डमधील वारणा हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

ते म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी आणि कामगार कायद्यांना देशभरात विरोध होत आहे. त्यामुळे हे कायदे रद्द करावेत. त्यांची अंमलबजावणी करू नये. शेतकरी आणि कामगारांना हे कायदे नेमके काय आहेत तेही अद्याप माहिती नाहीत. शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे हे कायदे रद्द करण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने आंदोलनाचे दोन टप्पे केले आहेत.

दोन ऑक्‍टोबरला शेतकरी मेळावे झाले. आता ऑनलाईन शेतकरी क्रांती संमेलन घेण्यात येणार आहे. त्याची लिंक सोशल माध्यमात बुधवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळी युवा नेते डॉ. जितेश कदम, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील, सोशल मीडिया प्रमुख अमित पारेकर, देशभूषण पाटील, शिवाजी मोहिते आदी उपस्थित होते. 

पाच लाख सह्यांचे निवेदन 
मंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कामगार कायद्याच्या विरोधात कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींना दोन कोटी सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पाच लाख सह्यांचे निवेदन पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Online Farmers Revolution Convention; Live broadcast across the state tomorrow