
उडुपी पोलिस पुन्हा बेळगावात; ग्रामपंचायत अध्यक्षाचा मोबाईल केला जप्त
बेळगाव - ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी उडुपी पोलिसांनी पुन्हा एकदा बेळगावात तपास सुरु केला आहे. हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांचा मोबाईल ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी चालवली आहे. तसेच या प्रकरणाशी संबधीत असलेल्या पीडीओ, पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपठेकेदारांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. पोलिसांनी चौकशीचा फास घट्ट आवळण्यास सुरूवात केल्याने या प्रकरणाशी संबधीतांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा: हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
मागील आठवड्यात तब्बल आठ दिवस उडुपीचे पोलिस पथक बेळगात तळ ठोकून होते. त्यांच्याकडून हिंडलगा ग्राम पंचायतीच्या तत्कालीन आणि सध्याच्या पीडीओंचीही कसून चौकशी करण्यासह कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली होती. त्याच बरोबर अध्यक्ष मन्नोळकर यांच्या निवास्थानी भेट देऊन प्रदिर्घ चौकशी केली होती. नागेश मन्नोळकर यांनी संतोष पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतल्याचे आढळून आले होते. या प्रकरणाशी संबधीत असलेल्या अन्य काही जणांची देखील पोलिस गेस्ट हाऊसमध्ये चौकशी केली होती. ठेकेदार पाटील यांनी हिंडलगा गावामध्ये केलेल्या ४ कोटी रूपयांतून केलेल्या १०८ विकास कामांचीही प्रत्यक्ष पाहणी केली होती.
आठ दिवसांच्या चौकशीनंतर पथक उडुपीला परतले होते. मात्र, उडुपीला देखील अध्यक्ष मन्नोळकर व इतरांना बोलावून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक शरणगौडा पाटील व त्यांचे सहकारी शुक्रवार (ता.२९) चौकशीसाठी पुन्हा बेळगावात दाखल झाले आहेत. नागेश मन्नोळकर यांनी संतोष पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही जीपीए का घेतली? त्यासाठी संतोष पाटील याना किती पैसे दिले होते. आदी प्रश्न विचारून उडुपी पोलिसांनी तपास चालविला आहे. तसेच अधिक चौकशीसाठी त्यांचा मोबाईल देखील आता पोलिसांनी जप्त केला आहे. तपास पथक आणखी काही दिवस बेळगात ठाण मांडून राहणार आहे.
हेही वाचा: भोंगे बंद करण्यासंदर्भात अजित पवार म्हणाले, 'फक्त मशिदींवरील...'
Web Title: Contractor Santosh Patil Suicide Case Udupi Police Again In Belgaum For Searching
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..