belgaum : कोरोना संसर्ग दर ०.०७ टक्के, चाचण्या कमी करण्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Virus Test

belgaum : कोरोना संसर्ग दर ०.०७ टक्के, चाचण्या कमी करण्याचा निर्णय

बेळगाव : संसर्ग दर कमी झाल्यामुळे बेळगावसह राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी करण्याची सूचना तांत्रीक सल्लागार समितीकडून आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. राज्यात दररोज पावणेदोन लाख कोरोना चाचण्या केल्या जातात. आता दररोज ६० हजार इतक्याच चाचण्या केल्या जाणार आहेत.

हेही वाचा: जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये लष्कराची मोठी कारवाई; पाच दहशतवाद्यांचा खात्मा

बेळगावमधील गेल्या आठवडाभरातील कोरोनाबाधीतांची संख्या पाहता कोरोना संसर्गाचा दर केवळ ०.०७ टक्के इतका आहे. १ ते १६ नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी पाहिली तर दररोज सहा किंवा त्यापेक्षा कमी बाधीत जिल्‍ह्यात आढळले आहेत. ८ नोव्हेंबर रोजी तर जिल्‍ह्यात एकही कोरोनाबाधीत सापडला नव्हता. नोव्हेंबर महिन्यात ४४ बाधीत सापडले आहेत. ऑगस्ट महिन्यात झालेली महापालिका निवडणूक, गणेशोत्सव, दसरा व नुकताच पार पडलेला दिवाळी सण या काळात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण निवडणूक किंवा सणाच्या काळातही संसर्ग वाढलेला नाही.

दिवाळी सण संपून दहा दिवसांचा कालावधी लोटला, पण जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगावसह संपूर्ण राज्यात कोरोना संसर्ग कमी झाला आहे. अभिनेते पुनित राजकुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी किंवा त्यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी बंगळूर येथे मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे बंगळूर शहरात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण बंगळूरमध्येही संसर्ग वाढलेला नाही. बेळगावातील सक्रीय कोरोनाबाधीतांची संख्या १६ नोव्‍हेंबरपर्यंत केवळ ६२ इतकीच आहे.

संपूर्ण कोरोना कालावधीत जिल्‍ह्यात ९४२ जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्हा मोठा असल्यामुळे येथे कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जात होत्या. कोरोना संसर्ग ज्यावेळी जास्त होता, त्यावेळी दररोज सुमारे पाच हजार कोरोना चाचण्या होत होत्या. संसर्ग कमी झाल्यानंतर चाचण्यांचे प्रमाण कमी झाले. शिवाय गेल्या दोन महिन्यात लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. त्याचेही सकारात्मक परीणाम दिसू लागले आहेत.

हेही वाचा: 30 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात प्रत्येकाला किमान एक डोस - टोपे

कोरोनाची तिसरी लाट येईल असे तज्ञांचे म्हणने आहे. त्याआधी कोरोनाचा बूस्टर डोस देता येईल का? याची चाचपणी राज्यशासनाकडून सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ७९ हजार ९४६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील ७८ हजार ९४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील १ हजार ७८५ जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडून आरोग्य विभागाला येणे बाकी आहे. आता कोरोना चाचण्या कमी होणार असल्यामुळे प्रयोगशाळेवरील ताणही कमी होणार आहे.

loading image
go to top