कोल्हापुरातील 'या' साखर कारखान्यांचे रोखले गाळप परवाने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

शुक्रवारी अधिकृतपणे हंगाम सुरू करण्याचे जाहीर केले असले तरी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेनंतरच हंगामाचे चित्र स्पष्ट होईल. दुसरीकडे कारखान्यांनी मात्र आपापल्या पातळीवर गाळपाची तयारी करून गाळप परवाने मिळवण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज केले होते. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते.

कोल्हापूर - शासकीय भागभांडवलासह शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम न दिल्याने जिल्ह्यातील सात कारखान्यांचा गाळप परवाना साखर आयुक्तांनी रोखून धरला आहे, तर विभागातील सात कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्जच केलेला नाही. कारवाई करण्यात आलेल्या काही कारखान्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांतील एफआरपीची रक्कम दिलेली नाही. 
विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. परिणामी यावर्षीच्या साखर हंगामाचे धोरणच अजून ठरलेले नाही.

दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हंगाम कधी सुरू करायचे, इथंपासून ते एफआरपीसंदर्भातील निर्णय होतो; पण यावर्षी ही बैठकच झालेली नाही. मंगळवारी (ता. १९) राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, सहकार सचिव आभा शुक्‍ला आदींशी चर्चा करून शुक्रवारपासून हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 

परवाने रोखलेले कारखाने (आजपर्यंतची माहिती)
उदयसिंगराव गायकवाड-बांबवडे, रिलायबल शुगर्स, मंडलिक-हमीदवाडा, नलवडे-गडहिंग्लज, कुंभी-कुडित्रे, दौलत-हलकर्णी, केन ॲग्रो-चंदगड

ऊस परिषदेनंतरच हंगामा

शुक्रवारी अधिकृतपणे हंगाम सुरू करण्याचे जाहीर केले असले तरी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेनंतरच हंगामाचे चित्र स्पष्ट होईल. दुसरीकडे कारखान्यांनी मात्र आपापल्या पातळीवर गाळपाची तयारी करून गाळप परवाने मिळवण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज केले होते. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयामार्फत हे अर्ज आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवले जातात. त्यात संबंधित कारखान्यांची एफआरपी थकीत आहे का ? शासनाचे भाग भांडवल परत केले का ? यासारखी माहिती पाठवली जाते. या माहितीच्या आधारे साखर आयुक्त कार्यालयाकडून एफआरपी व शासनाचे भाग भांडवल न दिल्याने जिल्ह्यातील सात कारखान्यांचे गाळप परवाने रोखून धरले आहेत. तर कोल्हापुरातील दोन व सांगलीतील पाच कारखान्यांनी अजूनही गाळप परवान्यासाठी अर्जच केलेले नाहीत. गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३८ कारखान्यांनी हंगाम घेतला होता. त्यात कोल्हापूरच्या २२, तर सांगलीच्या १६ कारखान्यांचा समावेश होता. यावर्षी सांगलीचे किमान तीन ते चार कारखाने सुरूच होणार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे कारखाने सुरू झाले तरी महापूर व अतिवृष्टीमुळे ऊस पीक वाया गेले आहे. त्यामुळे अपेक्षित ऊस पुरवठा या कारखान्यांना होण्याची शक्‍यता नाही. 

परवाने न मागितलेले कारखाने
महांकाली-सांगली, तात्यासाहेब कोरे-वारणानगर, आजरा-गवसे, यशवंत शुगर-सांगली, तासगाव कारखाना-सांगली, राजारामबापू युनिट ४ -जत, माणगंगा-सांगली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crushing Permission Of Seven Sugar Factory Cancelled