बापरे... सदाशिव पेठेत दरोडा; दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

दरोडेखोरांनी त्याच परिसरातील वॉचमन बाळकृष्ण आनंदराव गोडसे यांना लाकडी काठीने मारहाण करून तेथून पलायन केले. पोलिसांनी गोडसेंनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे.

सातारा : सहा दरोडेखोरांनी गॅस कटरने येथील सदाशिव पेठेतील ज्वेलर्सचे दुकान फोडून 28 हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने लंपास केले. दरोड्याची माहिती मिळताच परिसरातील वॉचमन बाळकृष्ण गोडसे हे घटनास्थळी गेले. तेव्हा दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करत तेथून धूम ठोकली.

जरुर वाचा - टॅक्‍सी चालकाचा प्रामाणिकपणा, 13 लाख केले परत
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हरी कोरे (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांचे राधाकृष्ण ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे 22 डिसेंबरला रात्री दुकानाला कुलूप लावून बंद केले होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास याच दुकानासमोर पाच ते सहा जणांचे टोळके आले. संशयितांकडे गॅस कटर होते. त्या गॅस कटरने संशयितांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. दरोडेखोरांनी दुकानातील 28 हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने लुटले. दरोडेखोरांच्या हालचाली सुरू असताना त्याच परिसरातील वॉचमन बाळकृष्ण आनंदराव गोडसे हे तेथे गेले. त्या वेळी काही चोरटे ज्वेलर्सच्या दुकानात, तर काही जण बाहेर टेहाळणीसाठी थांबले होते.

हेही वाचा - ऐकलंत का... सातारा पालिकेचे अधिकारी टाकतात पाट्या

गोडसे यांनी पाहिल्यानंतर संशयितांना त्यांनी हटकले. त्या वेळी दरोडेखोर घाबरले. दरोडेखोरांनी लाकडी काठीने गोडसे यांना मारहाण करून तेथून पलायन केले. पोलिसांनी गोडसेंनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या गुन्ह्याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dacoity Incident Took Place In Sadashiv Peth