ऐकलंत का... सातारा पालिकेचे अधिकारी टाकतात पाट्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 डिसेंबर 2019

नगरसेवकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देता येत नसतील तर सभागृहात काम करण्यास मी लायक नाही, हे लिहून द्या. अधिकारी मठ्ठ झाले असून, मुख्याधिकारी लक्ष घाला. केवळ मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाऱ्या करत बसू नका. गाळ्यांची वसुली होत नाही तोपर्यंत नगराध्यक्षांनी पगार थांबवावेत 

सातारा : प्रशासनाने कायपण करावे आणि आम्ही मंजूर करावे का? येथे बसलेलो आम्ही वेडे आहोत, असे वाटते का? कारवाई केल्याशिवाय प्रशासन सरळ होणार नाही, पालिकेत बसून पाट्या टाकता काय? सभागृहात काम करण्यास लायक नाही, असे लिहून द्या, अधिकारी मठ्ठ झालेत, अन्यथा सभागृहात काळे फासेन, अशा शब्दात प्रशासनावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले. सभेत वसंत लेवे, अशोक माने यांच्यासह काही नगरसेवकांनी मुख्याधिकारी, नगरअभियंत्यांवर तोफा डागल्या. 

 

वाचा :  पॅंट उतरविणारा नगरसेवक पडला पाया

जनतेच्या पैशांची उधळपट्टी करू नका 

सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत 34 विषय सभागृहाच्या मंजुरीसाठी ठेवले होते. त्यातील चार विषय तहकूब ठेवण्यात आले, तर 30 विषयांना मंजुरी देण्यात आली. शिर्के शाळेत शिक्षण मंडळाच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्यासाठी, तेथील कामासाठी 17 लाख 88 हजारांच्या खर्चास मंजुरी देण्यावरून मोनेंनी जोरदार विरोध केला. माहिती देण्यास बांधकाम अभियंता भाऊसाहेब पाटील उपस्थितीत नसल्याने मोने म्हणाले, ""त्यांना कारणे दाखवा नोटिस काढा. अधिकारी उपस्थितीत राहत नसतील तर कारवाई करा.''

सुहास राजेशिर्के यांनी "पाटील मागील सभेसही नव्हते. कारवाई केल्याशिवाय प्रशासन सरळ चालणार नाही,' असा आरोप केला. अनाठायी खर्च करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी करू नका, असा इशारा लेवेंनी देत हा विषय तहकूब ठेवला. 

 

हे वाचा : एनडीआरएफचे जवान मानवतेचे पुजारी : प्रा. डॉ. एन. डी. पाटील

उच्च न्यायालयात जाणार 

घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया सुधारित प्रकल्प अहवालाच्या विषयावर लेवे म्हणाले, ""नगरसेवक आंधळे आहेत, असा समज करून मुख्याधिकारी, सहकाऱ्यांनी निविदा काढली आहे. बायोमायनिंगची जागा कमी झाली तरीही त्याची रक्‍कम वाढली आहे. शासनाने मान्यता दिली आहे तर मग या त्रुटी का आल्या आहेत. नगररचना अभियंता भाऊसाहेब पाटील, अनंत प्रभुणे चुकीचे आहेत का? मुख्याधिकारीच बरोबर आहेत का? या विषयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे.'' 

 

हेही वाचा : कऱ्हाडच्या मध्यवस्तीत आढळले खवल्या मांजर

मुख्याधिकारी वाऱ्या करत बसू नका 

शॉपिंग सेंटरमधील गाळ्याबाबत मोने आक्रमक झाले. ते म्हणाले, ""पालिकेचे गाळे किती आहेत, किती वसुली झाली, किती थकले आहे, किती करार संपले आहेत? हे तुम्हाला माहित नाही तर येथे बसून काय पाट्या टाकता का? नगरसेवकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देता येत नसतील तर सभागृहात काम करण्यास मी लायक नाही, हे लिहून द्या. अधिकारी मठ्ठ झाले असून, मुख्याधिकारी लक्ष घाला. केवळ मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाऱ्या करत बसू नका. गाळ्यांची वसुली होत नाही तोपर्यंत नगराध्यक्षांनी पगार थांबवावेत.'' भाऊसाहेब पाटील 1.55 लाख पगार घेवूनही माझी जबाबदारी नाही, असा शेरा मारतात, असा आरोप वसंत लेवे यांनी केला. 

 

स्विमिंग पूल सुरू करा

अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी चारभिंती ते बोगद्यापर्यंत संरक्षक भिंत बांधा, अशी मागणी आशा पंडित यांनी केले. महाराजांनी सांगितले म्हणून कामे मंजूर करत असला तर आमचीपण करा, असा आरोपही आशा पंडित यांनी केला. सातारकरांसाठी स्विमिंग पूल सुरू करा, असे सिध्दी पवार यांनी सुचविले. स्विमिंग टॅंकबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. 

 

आवश्‍य वाचा : पुण्यातील युवकाने मित्रांना 20 लाखांना फसविले

हे विषय तहकूब... 
शिक्षण मंडळाचे स्थलांतरण करणे 
वाहतूक विभागात कंत्राटी चालक घेणे 
सफाई करणे, कचरा गाडीत भरण्याची निविदा 
मोकाट जनावरांना प्रतिष्ठामार्फत शेंद्रेत सोडणे 

या महत्वपूर्ण मंजुऱ्या... 
कोटेश्‍वर मंदिर ते मार्केट यार्ड रस्ता डांबरीकरण, गटरसाठी 1.28 कोटी 
मोडकळीस आलेली शौचालये पाडून त्याजागी नवीन शौचालये बांधने 
सदरबझारमध्ये (सर्व्हे नंबर 417) 1.86 कोटीचा शॉपिंग सेंटर प्रस्ताव करणे 
थ्री स्टार मानांकनासाठी पालिकेच्या कार्यवाहीला मंजुरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Municipal Officer Do Not Work