करेक्ट कार्यक्रम; पाहुण्याचे राजकारण आणि क्रॉस व्होटिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

काहींसाठी ही निवडणूक म्हणजे छोटीशी रंगीत तालीमच ठरली.

करेक्ट कार्यक्रम; पै-पाहुण्याचे राजकारण अन् क्रॉस व्होटिंग

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रथमच राजकीय पातळीवर लढवली गेली. निवडणूक ‘करेक्ट कार्यक्रम’, पै-पाहुण्याचे राजकारण, ‘क्रॉस व्होटिंग’ यामुळे गाजली. निवडणुकीनंतर उमेदवारांनी केलेला जल्लोष आणि विजयोत्सव यातून आगामी निवडणुकांतील राजकारणाची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे काहींसाठी ही निवडणूक म्हणजे छोटीशी रंगीत तालीमच ठरली. तसेच अनेकजण यानिमित्ताने ‘रिचार्ज’ झाल्याचे दिसले.

सहकारी संस्थेत राजकारण आणू नये, ही भूमिका ठेवून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी बिनविरोधचा फॉर्म्युला आणला होता; परंतु काँग्रेस आणि शिवसेनेने त्याला विरोध केला. त्यामुळे महाआघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली. राजकीय पक्ष पातळीवर प्रथमच निवडणूक झाली. महाआघाडीतील राष्ट्रवादीने ११, काँग्रेसने ७ आणि शिवसेनेने ३ जागा लढवल्या; तर भाजपने १६ जागा लढवल्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा गमवाव्या लागल्या. शिवसेनेने शंभर टक्के यश मिळवले; तर भाजपने १६ पैकी ४ जागांवर वर्चस्व सिद्ध करत लक्ष वेधले.

हेही वाचा: लोकशाहीवर ऑनलाइन परिषद; अमेरिकेकडून ११० देशांना आमंत्रण

निवडणुकीत जतमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्याविरुद्ध भाजप, राष्ट्रवादी एकत्र येऊन करेक्ट कार्यक्रम केल्याचे दिसले. तेथे आगामी विधानसभा निवडणुकीतील घडामोडींचे बीज पेरले गेले. आटपाडीत आगामी विधानसभेचे गणित लक्षात घेऊन राजकारण झाले. शिवसेनेच्या तानाजी पाटील यांनी भाजपच्या माजी आमदार राजेंद्र देशमुखांचा पराभव केला. पतसंस्था व बँक गटात धक्कादायकपणे क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसले. काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील व भाजपचे राहुल महाडिक यांनी बाजी मारली. या गटात पै-पाहुणे राबल्याचे दिसून आले.
निवडणुकीत सांगली विधानसभेसाठीचे इच्छुक विशाल पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक विधानसभेसाठीची तयारीच ठरली. कवठेमहांकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडे देखील या विजयानंतर ‘रिचार्ज’ झाले आहेत. अन्य तालुक्यातही असेच चित्र दिसून आले.

भाजपचा स्वतंत्र बाणा अन् चौकार

जयंत पाटील हे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आग्रही होते, मात्र काँग्रेसकडून त्याला विरोध झाला. त्यामुळे भाजपला बिनविरोधच्या चर्चेचे आमंत्रण आलेच नाही. त्यांना पॅनेल करावे लागले. काही नेत्यांची इच्छा नसताना भाजपने शड्डू ठोकला आणि ताकदीने डावही टाकले. ‘राजकारणात सगळे माफ असते’, यानुसार राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजपने उमेदवारी दिली. डाव जमले आणि भाजपच्या पॅनेलने धक्का देत चार जागा जिंकल्या. भाजपने पहिल्यांदाच सहकारी संस्थांची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली आणि त्यात छाप सोडली.

चौघांचा पराभव; नऊ जण फेरविजयी

तीन विद्यमान संचालकांचा पराभव झाला. त्यात आमदार विक्रम सावंत, सी. बी. पाटील, डॉ. प्रताप पाटील आणि स्वीकृत किरण लाड यांना पराभव पत्करावा लागला. विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, विशाल पाटील, बाळासाहेब होनमोरे, महेंद्र लाड, सुरेश पाटील यांचा विजयीत समावेश आहे. शिवाय, तज्ज्ञ संचालक ॲड. चिमण डांगे हेही संचालक झाले आहेत. अजितराव घोरपडे पूर्वी संचालक होते. तेही परतले आहेत.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

पहिल्यांदाच एंट्री

जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, सत्यजीत देशमुख, अनिता सगरे, राहुल महाडिक, मन्सूर खतीब, तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, बाळासाहेब पाटील, वैभव शिंदे हे पहिल्यांदाच संचालक म्हणून विजयी झाले आहेत.

शिवसेनेचे शंभर टक्के यश

सहकारी संस्थांची निवडणूक पक्षविरहित असली, तरी या लढतीत चार पक्षातील नेते रिंगणात होते. त्यात काँग्रेसचा दोन जागांवर, राष्ट्रवादीचा दोन जागांवर, भाजपचा १४ जागांवर पराभव झाला. शिवसेनेने तीन जागा लढवल्या आणि विशेष म्हणजे तीनही जागांवर त्यांनी विजय मिळवला. तीनही जागा सोसायटी गटातील असल्याने तीन तालुक्यांत शिवसेना नेत्यांनी आपली पकड दाखवून दिली.

जल्लोष बँकेचा, इशारा विधानसभेचा

मिरज शहरात जिल्हा बँकेच्या विजयाच्या जल्लोषात मिरज विधानसभा मतदारसंघाचा बिगूल वाजला. राष्ट्रवादीच्या बाळासाहेब होनमोरे यांनी ‘जिल्हा बँक तो झाँकी है, मिरज विधानसभा बाकी है’चा नारा देत पुन्हा शड्डू ठोकला. होनमोरे सलग दुसऱ्यांदा मागासवर्गीय प्रवर्गातून जिल्हा बँकेवर विजयी झाले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरजेचा पुढचा आमदार राष्ट्रवादीचा, अशी घोषणा आधीच केली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा जय मिळवल्यानंतर बळ दाखवण्याचा प्रयत्न बाळासाहेबांना केला. ‘मिरजेत आता भूमीपुत्र’चे फलक लावले गेले.

हेही वाचा: Sangli Bank - भाजपचे महाडिक विजयी; महाविकासला मोठा धक्का

loading image
go to top