संगमनेरात पुन्हा दिवाळी... 

आनंद गायकवाड 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

शपथविधी सोहळा सर्वांना पाहण्यासाठी थोरात यांच्या "यशोधन' या मध्यवर्ती संपर्क कार्यालयासमोर मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली होती. यशोधन कार्यालय, थोरात यांचे निवासस्थान विद्युतरोषणाईने नटले होते.

संगमनेर : मुंबईत शिवतीर्थावर झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर येथे थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मुंबईतील शपथविधीच्या कार्यक्रमासाठी येथील कॉंग्रेस व शिवसेनेचे तालुक्‍यातील जवळपास सर्व स्थानिक नेते व मोठ्या संख्येने कार्यकर्ते कालच (बुधवारी) तेथे गेले होते. 

निवासस्थान रोषणाईने उजळले 
शपथविधी सोहळा सर्वांना पाहण्यासाठी थोरात यांच्या "यशोधन' या मध्यवर्ती संपर्क कार्यालयासमोर मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली होती. यशोधन कार्यालय, थोरात यांचे निवासस्थान विद्युतरोषणाईने नटले होते. शपथविधी पाहण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी, थोरात यांची शपथ सुरू असतानाच फटाक्‍यांची आतषबाजी करीत शहर दणाणून सोडले. फटाक्‍यांची आतषबाजी सुमारे अर्धा तास सुरू होती. 

हेही वाचा आरं, मला शाळंत येऊ द्या की रं... 

थोरातांची भूमिका महत्त्वाची 
गायक अवधूत गुप्ते यांनी थोरात यांच्या निवडणूक प्रचारासाठी केलेल्या खास गाण्यावर, तसेच ढोल-ताशांच्या गजरात युवक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. थोरात यांनी अडचणीच्या काळात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना, महाविकास आघाडी स्थापन होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. कॉंग्रेसच्या गटनेतेपदी निवड, तसेच यापूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष, हिमाचल व गुजरातचे निरीक्षक, यांसह राष्ट्रीय वर्किंग कमिटीत कायमस्वरूपी सदस्य, अशा महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. 

महत्त्वाचे खाते मिळण्याची आशा 
मागील कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात महसूल, कृषी, जलसंधारण, शालेय शिक्षण, अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. या वेळी उपमुख्यमंत्रिपदासाठीच त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात त्यांचा समावेश झाल्याने, संगमनेर तालुक्‍यात सर्वत्र गुलालाची उधळण व फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. 

पाच वर्षांनंतर संगमनेरला कॅबिनेट 
बसस्थानक परिसरात धर्मवीर संभाजी तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष सतीश आहेर यांनी स्व-खर्चाने मोठा स्क्रीन लावून शपथविधी पाहण्याची व्यवस्था केली होती. शपथविधीनंतर बसस्थानक चौक व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी झाली. 2014नंतर पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संगमनेरला मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदामुळे आज येथे पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. 

नगरमध्ये आघाडीचा जल्लोष 
मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे व मंत्रिपदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर नगर शहरात शिवसेना व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीगेट येथे जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण केली. 

जिल्ह्यात सर्वत्र आनंदोत्सव 
जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, कर्जत तालुक्‍यातही ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali again in Sangamnera ...