कोणी फोन उचलता का फोन ! दहिवडीतील प्रवासी बेहाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

राज्य परिवहन महामंडळाच्या भाेंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. आगार प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे कर्मचारी मनमानी कारभार करताना दिसून येतात.

बिजवडी : दहिवडी (ता. माण) येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात सायंकाळी सहानंतर जाणीवपूर्वक फोन उचलले जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बसच्या वेळेची तसेच निर्धारीत वेळेत जाण्यासाठी बस आहे की नाही, अशा विविध समस्यांविषयी माहिती विचारता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटी थांब्यावर ताटकळत बसावे लागते.

राज्य परिवहन महामंडळाच्या या चुकीच्या कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. येथील आगार प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे कर्मचारी मनमानी कारभार करताना दिसून येतात.
 
दिवाळीच्या सणामुळे परगावी असलेले नागरिक सुट्यांसाठी गावी आलेले असतात. सुट्या संपत आल्याने ते पुन्हा मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणी जाण्यासाठी बसची सीट आरक्षित करण्यासाठी अथवा काही जण थेट बसथांब्यावर येऊन गाडीची वाट पाहात असतात. अनेकदा गाड्या वेळेवर येत नाहीत, गाडी आहे की गेली, अशा विविध समस्या प्रवाशांना भेडसावत आहेत.

परिणामी त्यांचे पुढचे जायचे नियोजन कोलमडत आहे. मात्र, हे विचारायचे कोणाला, एसटी आगारात फोन केला तर उचलला जात नाहीत. आगार प्रमुखांच्या कार्यालयात केला तरी उचलला जात नाही. त्यामुळे प्रवाशांना काहीच समजत नाही. अनेकांना गाडीची वाट पाहात ताटकळत बसावे लागते. काही जण गाडीची वाट पाहून घरी निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. राज्य परिवहन महामंडळाच्या दहिवडी आगाराने कारभारात सुधारणा करून प्रवाशांना सेवा द्यावी. तसेच आगारप्रमुखांनी लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या मनमानीला आवर घालावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. 

आम्ही मुंबईला जाण्यासाठी म्हसवड-दादर बसचे आरक्षण केले होते. बिजवडीतून आम्ही बसणार होतो. साडेसहाला येणारी बस पावणेआठ वाजता आली. बस आहे की गेली, याबाबत काहीच समजत नव्हते. दहिवडी आगारात फोन केला तर कोणीच उचलत नव्हते. खरे तर सायंकाळनंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सेवा देण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. 

- संतोष साळुंखे, प्रवासी, बिजवडी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Does anyone pick up the phone ! Dahivadi passengers gets confused for bus