काळजी करू नका, फार दिवस नाही : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पालिकेच्या विशेष सभेत श्री. गोरे यांच्या निषेधाचा ठराव सभागृहाने घेतला. मात्र, आजच्या कार्यक्रमात गोरे व्यासपीठावर होते. तर निषेध करणारे नगरसेवक प्रेक्षकांच्या रांगेत होते. शिवाय, उदयनराजेंनी अनेकदा गोरे साहेब असा उल्लेखही भाषणात केला. त्यामुळे अनेक नगरसेवकांचे चेहरे मात्र पडल्याचे जाणवत होते. 

सातारा : सातारा पालिकेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीच्या संकल्प रेखांकनासाठी घेण्यात आलेल्या "आयकॉनिक सातारा' या वास्तू विशारदांच्या देश पातळीवरील स्पर्धेत पुणे येथील आर्किटेक्‍ट कल्पक भंडारी, जयंत धरप, विनोद धुसिया यांच्या विकास स्टुडिओ या कंपनीला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांच्यासह इतर विजेत्यांना उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.

त्यावेळी विक्रमसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्‍टचे महाराष्ट्रचे अध्यक्ष सतीश माने, उपाध्यक्ष किशोर शिंदे, सातारा शाखेचे अध्यक्ष मयुर गांधी, सचिव विपुल साळवणकर, स्पर्धेतील निवड समितीचे सदस्य नामवंत वास्तूविशारद नितीन किल्लावाला, चंद्रशेखर कानेटकर व संजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील सर्वोत्तम 12 आराखड्यांचा समावेश असलेले कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात पार पडला.

हेही वाचा...  सरकार बदलाच्या हालचालीने सातारकरांच्या ताेंडाचा घास लांबणार ? 

यावेळी उदयनराजे भाेसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचे भाषण झाले. उदयनराजेंनी आपल्या भाषणात सातारा शहराच्या विकासात आमदार, खासदार, माजी खासदार, नगरसेवक, लोकांचे योगदान आहे, या विधानात माजी खासदार असा शब्द उदयनराजेंनी उच्चारताच हशा पिकला. त्यावर उदयनराजेंनी काळजी करू नका, फार दिवस नाही, असे सांगत राज्यसभेवर जाण्याचेच संकेत जणू दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't worry, it's not long says UdayanRaje