Dr Gopal Guru Comments On Social System
Dr Gopal Guru Comments On Social System

सध्याच्या समाजव्यवस्थेवर डॉ. गोपाळ गुरू म्हणाले, 

सांगली - समाज व्यवस्था कशी असावी आणि कशी असायला पाहिजे हा भविष्यातला प्रश्‍न आहे. सध्या जी समाज व्यवस्था आहे ती माणसाच्या कल्याणासाठी कमी पडते म्हणून ती अपुरी आहे. त्यामुळेच नविन समाज व्यवस्थेचे स्वप्न मार्क्‍स - गांधी आणि आंबेडकरांनी बघितले. तिघांचीही समाजव्यवस्थेची कल्पना आदर्शवादी होती, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू यांनी येथे मांडले. 

प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने शांतिनिकेतन लोकविद्यापीठा मार्क्‍स, गांधी, आंबेडकर यांच्या "समाज व्यवस्था' संकल्पनेवरील तिसऱ्या मंथनात पहिल्या सत्रात डॉ. गुरू यांचे बीजभाषण झाले. पुरोगामी विचार अभ्यासक प्रा. डॉ. उमेश बगाडे, प्रसाद कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मार्क्स, गांधी, आंबेडकर यांचा विचार भविष्यातला

डॉ. गुरू म्हणाले, ""मार्क्‍स, गांधी आणि आंबेडकरांनी विश्‍वाला गवसणी घालणारे विचार ग्रंथातून मांडले. त्यांच्यांवर लेखक व संशोधकांनी हजारो पाने लिहिली. कारण त्यांचा विचार भविष्यातला विचार होता. त्यावर कितीतरी पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे. मार्क्‍सनी जगातील कामगारांना एकत्र येण्याचे आवाहन केले. शोषणाची भांडवलशाही पद्धत गेली पाहिजे असे त्यांनी सांगितले. गांधीजीनी प्रत्येकाने श्रम केले पाहिजे असा विचार मांडला. त्यांना ऐतखाऊ समाज नको आहे. आंबेडकरांनी देखील ऐतखाऊ समाजाला विरोध केला. स्त्रीयांना केवळ कामाला जुंपणे, विसावा न देणे आणि स्वातंत्र्य न देणे तिघांना मान्य नव्हते. मार्क्‍स-आंबेडकरांची स्त्रीला अधिक स्वातंत्र्य देण्याची भूमिका होती.'' 

स्पर्श हा शारिरीक नसून भावनिक

ते पुढे म्हणाले, ""सध्या बाहेरचे जग कोते बनत चालले आहे. सिमित होत चालले आहे. संवाद आणि देवाण-घेवाण संपत चालले आहे. तंत्रविज्ञान समाजाला तोडत आहे. त्यामुळे एकमेकात मिसळले पाहिजे. स्पर्श हा आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. ज्या समाजात स्पर्श हा विटाळ समजला जातो त्या समाजाचा समाचार आपण घेतला पाहिजे. गांधीचाही अस्पृश्‍यवादाविरोधात लढा होता. स्पर्श हा शारिरीक नसून भावनिक आहे. भावनाविरहीत समाज नको आहे. मार्क्‍सच्या विचारात सुरवातीला मानवतावाद होता. गांधींनी सेवा तर आंबेडकरांनी स्वाभिमान सांगितला. सत्व व स्वाभिमान जपता यावा हे तिघांचे स्वप्न होते. माणूसच मुल्य निर्माण करतो. माणूसच चूकांची दुरूस्ती करू शकतो. त्यामुळे माणूस संपवणारे जे-जे संकट आहे, त्यावर विचार मंथन आवश्‍यक आहे. हीच विचारांची परंपरा आहे.'' 

जातीची ओळख ही अस्वच्छच

डॉ. उमेश बगाडे म्हणाले, ""समाजात तीन प्रकारच्या विषमता आहेत. एक वंश परंपरागत दुसरी वारशाची आणि तिसरी विषमता कर्तृत्ववान ही आहे. यातील पहिल्या दोन विषमता गाडून तिसरी स्वकर्तृत्वाने येणारी विषमता स्विकारण्याचे डॉ. आंबेडकरांनी सांगितले. भारतातील जातीव्यवस्थेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या तिहेरी तटबंदीवर हल्ला चढवावा लागेल. श्रमिक जातीमध्ये लुटले जाऊनसुद्धा ब्राह्मण्यवाद, भांडवलशाहीविरोधात एकजुट होत नाही. भारताच्या समाजक्रांतीचे चाक रूतले आहे, कारण दोन व्यक्तींमध्ये, समुहामध्ये मातृभाव नाही. त्यामुळेच डॉ. आंबेडकरांनी बंधुभाव प्रस्थापित व्हायला हवा असे सांगितले. जात नावाची गोष्ट तुम्हाला अलिप्त करते. जातीचे भान वरच्या जातीच्या असुयेमध्ये आणि खालच्या जातीच्या द्वेषात दिसते. जातीची ओळख ही कधीही स्वच्छ असत नाही. त्यातून मातृभाव, बंधूभाव निर्माण होत नाही.'' विचारमंथनचे स्वागताध्यक्ष गौतम पाटील यांनी स्वागत केले. विचार मंथनाचा हेतू सांगितला. सनतकुमार आरवाडे, तानाजीराव मोरे, डॉ. मोहन पाटील, बी.आर. थोरात यांच्या हस्ते वक्‍त्यांचा सत्कार करण्यात आला. विचारमंथनासाठी राज्यातील विविध भागातून विचारवंत उपस्थित होते. प्रा. राणी यादव यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. सिकंदर जमादार, प्रकाश जमदाडे यांनी आभार मानले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com