जयसिंगपूर येथील हाॅटेलात अशी होत होती विजेची चोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

नितीन जोशी हे महावितरणमध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे जिल्ह्यातील वीज चोरीवर नियंत्रण ठेवण्याचे काम आहे. त्यांच्या भरारी पथकाने ऑगस्टमध्ये जयसिंगपूरात वीज मीटरची तपासणी मोहीम हाती घेतली होती.

कोल्हापूर - वीज मीटरमध्ये फेरफार करून सुमारे पाच लाख ६० हजारांची वीजचोरी केल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील तीन संशयित हॉटेल मालकांवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद ‘महावितरण’चे सहायक अभियंता नितीन बाळू जोशी (वय २९, रा. फुलेवाडी) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, नितीन जोशी हे महावितरणमध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे जिल्ह्यातील वीज चोरीवर नियंत्रण ठेवण्याचे काम आहे. त्यांच्या भरारी पथकाने ऑगस्टमध्ये जयसिंगपूरात वीज मीटरची तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या पथकाने २ ऑगस्ट रोजी जयसिंगपुरातील सुरेखा लंच होम या हॉटेलच्या मीटरची तपासणी केली. 

त्यात त्यांना हे मीटर संथगतीने फिरत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी हे मीटर जप्त करून ते तपासणीसाठी पाठवले. तपासणीत हे मीटर दोषी असल्याचे आढळले. हे मीटर वापरणारे भारत विष्णू कलाल यांनी निर्धारित केलेल्या २४ महिन्यांच्या काळात ९,७५१ वीज युनिटची चोरी केल्याचे निश्‍चित करण्यात आले. त्याची रक्कम १ लाख ७९ हजार ५७० रुपये इतकी झाली. याबाबत तडजोडीची १५ हजारांची रक्कम इतकी त्यांना दिली होती. मात्र, या दोन्ही रकमा त्यांनी न भरल्याने भारत कलाल व व्यंकटेश कलाल यांच्या विरोधात जोशी यांनी वीज चोरीची फिर्याद दिली.

पथकाने २० ऑगस्ट रोजी जयसिंगपुरातील संजय यशवंत जाधव यांच्या एसपी बीअर बारच्या विद्युत मीटरची तपासणी केली. यात हे मीटरही संथ गतीने फिरत असल्याचे संशय आला. ते मीटर पथकाने तपासणीसाठी पाठवले. त्यात ते दोषी आढळले. निर्धारित केलेल्या १३ महिन्यांत जाधव यांनी ६४६५ इतकी वीज युनिटची चोरी केल्याचा ठपका ठेवला. त्याची रक्कम १ लाख २८ हजार २४० इतकी झाली. त्याचप्रमाणे विद्युत कायद्यानुसार तडजोड रक्कम २५ हजार रुपये इतकी निश्‍चित झाली; पण या रकमा वेळेत न भरल्याने त्यांनी संजय जाधव (रा. जयसिंगपूर) यांच्या विरोधात फिर्याद दिली गेली.   

पथकाने २१ ऑगस्ट रोजी अशोक नेमीनाथ हेरवाडे यांच्या लॅंन्डमार्क बीअर बार ॲन्ड लॉजिंगच्या मीटरची तपासणी केली. त्यात पथकांना शंका आली. त्यामुळे हे मीटर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. यात हेरवाडे यांनी निर्धारित २४ महिन्यांत १३४६० वीज युनिटची चोरी केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला. त्याची रक्कम २ लाख ५१ हजार ७०० रुपये इतकी झाली. याबाबत कायद्यानुसार तडजोड रक्कम ५५ हजार रुपये निश्‍चित केली. मात्र, या दोन्ही रकमा न भरल्याने जोशी यांनी हेरवाडे यांच्या विरोधात फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार संबंधित संशयितांवर गुन्हे दाखल केले. तपासणी पथकात अमित बोकिल, वर्षा जाधव, बापू निचिते आदींचा समावेश होता.

अहो आश्चर्यम ! विना शस्त्रक्रिया बदलली हृदयाची झडप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity theft in Three Hotels in Jaysingpur