नगरच्या भूमिपुत्राचा विदेशात डंका! 

Engineer Dhumal's overseas work
Engineer Dhumal's overseas work

नगर : सांगली जिल्ह्यात ऑगस्ट 2019मध्ये महापुराचा भीषण फटका बसला. हजारो कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. याची आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली. सांगलीचा पूर व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निश्‍चित केले. त्यामुळे देशात पूर निवारणाचा एक आदर्श तयार होईल, याची जबाबदारी संयुक्त राष्ट्र महासंघ, जपान सरकारने घेतली. त्यासाठी कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांची जपानने निवड केली. धुमाळ हे आज (रविवार) अभ्यास दौऱ्यासाठी जपानला रवाना होणार आहेत. धुमाळ यांच्या रूपाने जिल्ह्याच्या भूमिपुत्राचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजला आहे.

धुमाळ हे जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्‍यातील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षक महादजी शिंदे विद्यालयात झाले. पुणे येथे उच्च शिक्षण झाले. सध्या ते पीएच.डी. करत आहेत. सांगलीला 2005 व 2019ला महापुराचा विळखा बसला होता. त्यामुळे जपान शासन धुमाळ यांच्याकडून सांगलीचा पूर व्यवस्थापन आराखडा तयार करून घेणार आहे. त्याचप्रमाणे देशातील कोल्हापूरसह इतर शहरांचा आराखडा तयार करून संयुक्त राष्ट्र महासंघास कळवला जाणार आहे. यासाठी 6 जानेवारी ते 22 फेब्रुवारीदरम्यान धुमाळ टोकियोमध्ये राहतील. या प्रकल्पाला सांगलीमधून सहायकाची जबाबदारी विनोद मुंजाप्पा, सचिन पवार व सूर्यकांत नलावडे हे कार्यकारी अभियंता पार पाडणार आहेत.

धुमाळांचा सेंदाई फ्रेमवर्क जगप्रसिद्ध आराखडा 
जपानसारख्या देशास त्सुनामी व भूकंपाचा कायम धोका असतो. धुमाळ यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे. सेंदाई फ्रेमवर्क हा त्यांचा जगप्रसिद्ध आराखडा आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मार्च 2015 च्या आमसभेत त्याला मान्यता दिली. त्यानुसार जागतिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 2015-2030 कृती आराखडा करणे प्रत्येक राष्ट्रावर नैतिक बंधन आहे. संयुक्त राष्ट्र महासंघ, जपान शासनाने त्याबाबत पुढाकार घेतला आहे. प्रत्येक देशांमधील एका शहराचा आराखडा करून घेण्याचे धोरण ठरविले आहे.

प्रशासकीय सेवेतील लेखाजोखा 
धुमाळ यांनी 2005मध्ये सांगलीमध्ये कार्यरत असताना कर्नाटकशी समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांचा सांगली पूरविषयक अभ्यास लेख विशेष गाजला. या लेखाचा जगभरातून नेटवरून डाऊनलोडचा विक्रम झाला. धुमाळ यांनी आतापर्यंत 26 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत शोधनिबंध सादर केले. 2019च्या पूरविश्‍लेषण समितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पूर पूर्वानुमान व व्यवस्थापन या विषयावर ते सध्या पीएच.डी. करीत आहेत. जपान दौऱ्यानंतर ती पूर्ण होणार आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com