सरकारच्या स्थापनेच्या किमान समान कार्यक्रमावर राजू शेट्टी म्हणाले,

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

" उसाची निर्यातबंदी आम्ही मानत नाही. शेतकऱ्यांना अधिक दर मिळत असेल तर निर्यात बंदी गैरवाजवी आहे. गतवर्षी एफआरपी दिलेला नाही त्यांना गाळप परवाने देऊ नयेत अशी आमची भूमिका आहे. अन्यथा असे कारखाने बंद पाडू. "

गडहिंग्लज (कोल्हापूर ) - कॉंग्रेस - राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन विधानसभा निवडणूक लढविली पण, आता परिस्थिती वेगळी आहे. भाजप - शिवसेनेचे न जमल्यामुळे शिवसेना - कॉंग्रेस - राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. त्यांच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी असेल तर सोबत राहू, असे प्रतिपादन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

शेतकरी विरोधी भाजपला वगळून राज्यात सरकार व्हावे, ही भूमिका कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथे होणाऱ्या 18 व्या ऊस परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर श्री. शेट्टी यांनी गडहिंग्लज विभागाचा दौरा केला. या प्रसंगी पत्रकार परिषदेते ते बोलत होते.

आधी त्यांचे ठरु द्या, मग आमचे ठरवू
युतीच्या मागील मंत्रिमंडळात स्वाभीमानीला एक राज्यमंत्रीपद मिळाले होते. आता स्वाभीमानी घटक असणाऱ्या आघाडीचे सरकार शिवसेनेसोबत सत्तेवर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी आग्रही राहणार का, याबाबत विचारणा केल्यानंतर श्री. शेट्टी यांनी 'आधी त्यांचे ठरु द्या, मग आमचे ठरवू' अशा शब्दात भूमिका मांडली.

हेही वाचा - शेतकऱ्यांनो, संयम पाळा; राजू शेट्टींनी का केले असे आवाहन ? 

परदेशातून साखर आयात होऊ देणार नाही ....

श्री. शेट्टी म्हणाले, 'यंदाची ऊस परिषद एका वेगळ्या परिस्थितीत होत आहे. आधी दुष्काळाने आणि नंतर महापूराने अडचणीत आणले आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे. उत्पादकता घटल्याने साखर उत्पादनही निम्म्याने घटण्याची शक्‍यता आहे. देशातील परिस्थितीही काही प्रमाणात अशीच आहे. गरजेइतके साखर उत्पादन होणार असल्याने परदेशातून साखर आयात होऊ देणार नाही. परिणामी भाव स्थिर राहतील किंवा वाढतीलही. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चार पैसे जादा मिळतील.'

एफआरपी न दिलेल्यांना गाळप परवाने देऊ नयेत..

ते म्हणाले,'उसाची निर्यातबंदी आम्ही मानत नाही. शेतकऱ्यांना अधिक दर मिळत असेल तर निर्यात बंदी गैरवाजवी आहे. गतवर्षी एफआरपी दिलेला नाही त्यांना गाळप परवाने देऊ नयेत अशी आमची भूमिका आहे. अन्यथा असे कारखाने बंद पाडू. यंदा ऊस पूरात सापडल्याने रिकव्हरी कमी बसणार आहे. परिणामी, पुढील वर्षी एफआरपी कमी मिळणार आहे. एफआरपी वाढीसाठी कृषीमूल्य आयोगासोबत बैठक घेणार आहे.''

हेही वाचा - अबब !  भाकरी महागली; शाळू दरात इतकी वाढ 

राजकारणात अपयश शेतकरी चळवळीला यश
'स्वाभीमानी'चे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी स्वागत केले. राजकारणात चळवळीला अपयश आले असले तरी शेतकरी चळवळीला नेहमीच यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष पाटील, अशोक पाटील, ऍड. आप्पासाहेब जाधव, संजय मिरजे, मनोहर दावणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - सांगलीत बेदाणा सौद्यात मिळाला इतका उच्चांकी दर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MP Raju Shetti Comment On Government Formation