शेतकऱ्यांनो, संयम पाळा; राजू शेट्टींनी का केले असे आवाहन ?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

""कर्नाटकातील कारखान्यांनी गतवर्षी 2300 रुपयांचा दर दिला होता. या वर्षी त्यांनी 2700ची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांकडून यात वाढ होणार आहे. हा या कारखानदारांच्या स्पर्धेचा परिणाम आहे."

चंदगड ( कोल्हापूर ) - या वर्षी महाराष्ट्रासह कर्नाटकातही उसाचे क्षेत्र कमी आहे. ऊस मिळवण्यासाठी कारखानदारांत चढाओढ लागणार आहे. शेतकऱ्यांनी या परिस्थितीचा लाभ उठवायला हवा. संयम पाळल्यास घसघशीत दराचे दान पदरात पाडून घेणे शक्‍य आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना साद घातली.

जयसिंगपूर येथे 23 तारखेला होणाऱ्या ऊस परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर आज (ता. 20) मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील मेडिकल हॉलमध्ये तालुक्‍यातील शेतकऱ्यांची सभा झाली. त्यावेळी शेट्टी बोलत होते. संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर प्रमुख उपस्थित होते. स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

हेही वाचा - अबब !  भाकरी महागली; शाळू दरात इतकी वाढ 

शेतकरी जो निर्णय घेतील, तो शासनाला मान्य करेल

शेट्टी म्हणाले, ""कर्नाटकातील कारखान्यांनी गतवर्षी 2300 रुपयांचा दर दिला होता. या वर्षी त्यांनी 2700ची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांकडून यात वाढ होणार आहे. हा या कारखानदारांच्या स्पर्धेचा परिणाम आहे. शेतकऱ्यांनी संयम पाळल्यास हा दर आणखी वाढून मिळणे शक्‍य आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. ते उसाच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऊस परिषदेमध्ये महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकरी जो निर्णय घेतील, तो शासनाला मान्य करावा लागेल.''

हेही वाचा - हत्तरगी नाक्‍यावर क्षणात होणार टोल वसूली; कशी काय ? 

ऊस तोडणीची घाई नको

राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, ""विभागातील सर्वच कारखान्यांनी ऊस तोडणीची घाई करू नये. शेतकऱ्यांनीही संयम पाळावा. संयमातच ऊस दर लपला आहे.  संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळाराम फडके, माजी सभापती जगन्नाथ हुलजी, राजेंद्र पाटील, विश्‍वनाथ पाटील, गजानन राजगोळकर यांचीही भाषणे झाली. सतीश सबनीस, शिवाजी कांबळे, प्रकाश भोगुलकर, पांडुरंग बेनके, बाबू कदम, विलास पाटील यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MP Raju Shetti Comment On Sugar Rate Issue