राजू शेट्टी कशासाठी चालले काश्मिरला ?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 November 2019

काश्‍मीर येथील शेतकऱ्यांशी संपर्क झाल्यानंतर शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचेशी पत्रव्यवहार केला. काश्‍मीर येथील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने खरेदी केंद्रे सुरू करण्याची त्यांनी मागणी केली

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी 13 ते 15 नोव्हेंबरपर्यंत जम्मू -काश्‍मीर दौऱ्यावर जात आहेत. काश्‍मीरमधील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. या शेतकऱ्यांचे 20 लाख टन सफरचंद विक्री न झाल्याने खराब होत चालली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे सदस्य या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. 

जम्मू काश्‍मीरमध्ये कलम 370 रद्दमुळे अनेक महिन्यांपासून हायअलर्ट लागू आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात सफरचंदाचे उत्पादन झाले असताना त्याची विक्री होत नसल्याने हे शेतकरी अडचणीत आले आहेत. या परिस्थितीत मदत करण्याच्या उद्देशाने संबंधित शेतकऱ्यांनी दीड महिन्यापूर्वी शेट्टी यांच्याशी संपर्क साधला. राज्यात मोठ्या प्रमाणात सफरचंद पिक आले आहे. मात्र सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे शेतामधून सफरचंद खरेदीसाठी कोणीही व्यापारी येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याप्रश्‍नी मदत करण्याची विनंती संबंधित शेतकऱ्यांनी शेट्टी यांना केली होती. 

सफरचंद लागले कुजू

काश्‍मीर येथील शेतकऱ्यांशी संपर्क झाल्यानंतर शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचेशी पत्रव्यवहार केला. काश्‍मीर येथील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने खरेदी केंद्रे सुरू करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच हमीभावाने शेतकऱ्यांच्या बांधावरून सफरचंद खरेदी करण्याची मागणी केली. मात्र यावर काहीच कारवाई झाली नाही. सफरचंद खरेदी करण्यासाठी व्यापारी न आल्याने शेतामध्ये सफरचंद कुजून जाऊ लागले आहेत. जवळपास 20 लाख टन सफरचंदाचे उत्पादन झाले असून सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भिती शेतकरी व्यक्‍त करत आहेत. त्यामुळेच याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेट्टी यांच्यासह शिष्टमंडळ काश्‍मीरला रवाना होत आहे. 

तीन दिवसाचा काश्‍मीर दौरा 
अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीचे शिष्टमंडळ बुधवारी (ता.13) काश्‍मीरला रवाना होणार आहे. या दौऱ्यात ते स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेणार आहेत. याबाबत तोडगा काढण्यासाठी ते काश्‍मीरच्या राज्यपालांचीही भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंह, स्वराज्य इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव, प्रेमसिंह गेहलावत, कृष्णप्रसाद पद्मनाभमन, अखिल भारतीय मजदूर संघटनेचे महासचिव पी. सत्यवान आदिंचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MP Raju Shetti On Jammu Kashmir Tour