हातोहात संपला माल!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

बालविक्रेत्यांचा शेतमाल हातोहात संपला. लाखभर रुपयांची उलाढाल झाली. अवघ्या दोन तासांत मैदान रिकामे झाले. उशिरा आल्याने काहींना रिकाम्या थैल्या घेऊन परतावे लागले. 

 

राहुरी : सकाळची वेळ. शाळेच्या मैदानात सूर्याची कोवळी किरणे पसरलेली. शेकडो बालगोपाळ आपल्या शेतातील ताजा व सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी घेऊन बसले. खरेदीसाठी महिला-ग्रामस्थांची झुंबड उडाली. मैदान गजबजून गेले. बालविक्रेत्यांचा शेतमाल हातोहात संपला. लाखभर रुपयांची उलाढाल झाली. अवघ्या दोन तासांत मैदान रिकामे झाले. उशिरा आल्याने काहींना रिकाम्या थैल्या घेऊन परतावे लागले. 

 

राहुरी फॅक्‍टरी येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आज विद्यार्थ्यांचा कृषी बाजार भरला. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, विक्री कौशल्य, स्वकमाईची किंमत, श्रमाचे मोल याचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने संस्थाप्रमुख माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कृषी बाजाराचे हे तिसरे वर्ष आहे. भल्या सकाळी सात वाजताच विद्यार्थी विक्रेत्यांनी शाळेचे मैदान फुलले. भाजीपाल्याचे 88 स्टॉल्स, खाद्यपदार्थ 20, धान्य व कडधान्ये 10, कटलरीचे 3, असे 121 स्टॉल्स लागले होते. सकाळी आठ वाजता बाजार भरला. 

हेही वाचा - महावितरणकडून कर्जतकर वेठीस 
 

आदिनाथ वसाहत, गुरुकुल वसाहत, समर्थनगर, प्रसादनगर, गणेगाव, चिंचविहिरे येथील महिला व ग्रामस्थांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. ताज्या पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, बटाटे, लिंबू, गावरान कडधान्ये, बोरे, पेरू, सफरचंद, सौंदर्य प्रसाधने, शालेय साहित्य, मुलींनी तयार केलेले बटाटेवडे, भजी, भेळ खरेदीसाठी झुंबड उडाली. "उत्पादक ते उपभोक्ता' अशी थेट विक्री झाल्याने माफक दरात ताजा भाजीपाला खरेदी करताना ग्राहकांची क्रयशक्ती वाढली. नेहमी तीनशेचा आठवडेबाजार करणाऱ्यांनी 600 रुपयांची खरेदी केली. अवघ्या दोन तासांत सर्व माल हातोहात संपला. लाखभर रुपयांची उलाढाल झाली. पैसे मोजून खिशात घालताना मुला-मुलींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहिला.

हेही वाचा - नादूरूस्त रस्ते होणार सिमेंटचे 

 

सकाळी सव्वा दहा वाजता शाळेचे मैदान रिकामे झाले. 
माजी खासदार प्रसाद तनपुरे, बाळासाहेब कदम, नगरसेवक अंजली कदम, पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, मुख्याध्यापक सुरेश शिरसाठ, शिक्षक प्रदीप तनपुरे, कविता जेजूरकर यांनी खरेदी करून, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. 

थैली रिकामीच राहिली 

शालेय विद्यार्थ्यांच्या बाजारात ताजा व सेंद्रिय भाजीपाला मिळतो. विद्यार्थ्यांच्या शेतातील भाजीपाला असल्याने आठवडेबाजारापेक्षा कमी दर असतो. यंदा गर्दी जास्त वाढली. सकाळी सव्वा दहा वाजता खरेदीला आलो, तेव्हा बाजार आटोपला होता. बाजाराची थैली रिकामीच राहिली. 

- ललित चोरडिया, ग्राहक, राहुरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finished goods in the hands!राहुरी : सकाळची वेळ. शाळेच्या मैदानात सूर्याची कोवळी किरणे पसरलेली. शेकडो बालगोपाळ आपल्या शेतातील ताजा व सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी घेऊन बसले. खरेदीसाठी महिला-ग्रामस्थांची झुंबड उडाली. मैदान गजबजून गेले. बालविक्रेत्यांचा शेतम