आम्हाला पहिल्यांदाच मिळाली नोटीस 

प्रमोद बोडके
Monday, 9 December 2019

केडर बरखास्तीसाठी आलेल्या नोटिशीवर म्हणणे सादर करण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यातील 670 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिव, अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात हजेरी लावली.

सोलापूर : सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था अर्थात केडरचे अस्तित्व कायदेशीररीत्या संपुष्टात आल्याचा मुद्दा उपस्थित करत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केडर अवसायनात काढण्याची अंतिम नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर म्हणणे मांडण्यासाठी आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधकांनी काढलेली अंतिम नोटीस आमच्यासाठी पहिलीच नोटीस आहे. यापूर्वी केडर बरखास्तीबाबत आम्हाला कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती, हा मुद्दा जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी आज उपस्थित केला. 

हेही वाचा : शिवसेना पुन्हा गेली भाजपसोबत; बाजूने केले मतदान

संस्थांनी आपले लेखी म्हणणे दिले
केडर बरखास्तीसाठी आलेल्या नोटिशीवर म्हणणे सादर करण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यातील 670 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिव, अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात हजेरी लावली. पंढरपूर तालुक्‍यातील 110, मोहोळ तालुक्‍यातील 104, सांगोल्यातील 78, माळशिरसमधील 107, माढ्यातील 162, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 48 आणि बार्शी तालुक्‍यातील 61 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी आपले लेखी म्हणणे दिले आहे. केडर बरखास्तीवर म्हणणे मांडण्यासाठी बार्शी तालुक्‍यातील संस्थांनी ऍड. विकास जाधव यांची तर उत्तर सोलापूर तालुक्‍यातील सोसायट्यांनी ऍड. वैभव देशमुख यांची नियुक्ती केली आहे. केडर वाचविण्यासाठी जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था एकवटू लागल्या असल्याचे चित्र आज दिसले. 

हेही वाचा : अंकिता रैनाचा सोलापुरात डबल धमाका!

17 ला होणार सुनावणी 
केडर बरखास्तीवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे स्वतः कार्यालयात उपस्थित नसल्याने आज सुनावणी झाली नाही. या सुनावणीसाठी आता 17 डिसेंबरची तारीख देण्यात आली असून सकाळी 11 वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ही सुनावणी होणार आहे. केडर बरखास्तीवर म्हणणे मांडण्यासाठी आज मुदत देऊनही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व केडरच्या अवसायकांनी केडर बरखास्तीबाबत म्हणणे मांडले नाही. 

हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वावर जयंत पाटील म्हणाले

27 कोटींचे काय करणार? 
जिल्ह्यातील सोसायटी सचिवांच्या वेतन व इतर भत्त्यांपोटी शेतकऱ्यांच्या वसुलातून कपात केलेली रक्कम केडरकडे संकलित झाली आहे. वर्षानुवर्षे कपात केलेल्या या रकमेतून जवळपास 27 कोटी रुपयांच्या ठेवी केडरकडे जमा झाल्या आहेत. केडर अंतिम अवसायनात घेऊन त्यानंतर त्याची नोंदणीच रद्द केली जाणार आहे. केडरच्या या मालमत्तेचे काय होणार? केडरकडे असलेल्या 27 कोटी रुपयांचे काय करणार? हे प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the first notice we get