लाकडी कपाट अंगावर पडले अन् घडला हा अनर्थ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

परत घरी आल्यानंतर दुपारी तो अंगणवाडीचे कपडे काढून कपाटातील दुसरे कपडे घेण्यासाठी गेला. आतील खोलीत आजी बसली होती. स्वत:च कपाटातील कपडे ओढून घेताना 70 ते 80 किलो वजनाचे लाकडी कपाट अहिलच्या अंगावर पडले

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - कपडे काढून घेत असताना लाकडी कपाट अंगावर पडल्याने पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. अहिल यास्मिन कुडचीकर असे या चिमुकल्याचे नाव आहे. शहरातील गवळीवाड्यात आज दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. 

याबाबतची माहिती अशी, की अहिलचे वडील यास्मिन इचलकरंजीत वाहनावर चालक आहेत. कामानिमित्त ते पत्नी व एका मुलासह तेथेच राहतात. अहिल हा गवळीवाड्यात आजीकडे होता. गेले पंधरा दिवस तो इचलकरंजीत आई - वडीलाकडेच गेला होता; परंतु आजीचे मन लागत नसल्याने दोन दिवसांपूर्वीच ती अहिलला गडहिंग्लजला घेऊन आली. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे मोहिते लॉनमधील नगरपालिकेच्या अंगणवाडीत गेला. परत घरी आल्यानंतर दुपारी तो अंगणवाडीचे कपडे काढून कपाटातील दुसरे कपडे घेण्यासाठी गेला. आतील खोलीत आजी बसली होती. स्वत:च कपाटातील कपडे ओढून घेताना 70 ते 80 किलो वजनाचे लाकडी कपाट अहिलच्या अंगावर पडले. त्यामुळे कपाटाखाली तो दबला गेला. काही तरी मोठा आवाज आल्याने आजी उठून बाहेर आली. ही घटना पाहताच आजीने ओरडा केला. इतक्‍यात शेजारील मंडळी धावून आली. कपाट उचलून अहिलला बाहेर काढून तत्काळ रिक्षातून खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. चिमुकल्या अहिलवर काळाने ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 

जीवाच्या आकांताने धाव 
कोवळ्या जीवाच्या जाण्याची माहिती मिळताच अहिलचे आई-वडीलांनी गडहिंग्लजकडे धाव घेतली. त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. तसेच या घटनेने उपस्थित नागरिकांचे मनही हेलावून गेले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Years Child Dead After Falling Wooden Safe