एकरकमी एफआरपीसह 350 दराची 'या' संघटनांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

""राज्यात सरकार नसल्यामुळे मंत्री समितीची बैठक़ नाही. हंगामाचे धोरण ठरलेले नाही. अशा स्थिती साखर आयुक्तांनी आपल्या अधिकारात उसाचा हंगाम 25 नोव्हेंबरपासून सुरू करावा. सध्या शेती आणि शेतकरी अडचणीत आहेत."

कोल्हापूर - मागील हंगामातील एफआरपी, थकीत एफआरपीचे 15 टक्के व्याज आणि तोडग्याप्रमाणे ठरलेले प्रतिटन 200 रुपये दिले नसताना यंदाच्या हंगामावर चर्चाच होतेच कशी? एकरकमी एफआरपी द्यावीच लागणार आहे. यात स्वाभिमानीने वेगळी मागणी काय केली. स्वाभिमानी संघटना आणि कारखादारांची काल (रविवारी) झालेली चर्चा म्हणजे नूरा कुस्ती आहे. त्यामुळे, आंदोलन अंकुश, जय शिवराय आणि बळीराजा शेतकरी संघटनेकडून थकीत एफआरपीसह यंदाच्या हंगामात एकरकमी एफआरपी आणि प्रतिटन 350 रुपये दर मिळावा अशी मागणी केली. यासाठी बुधवारी (ता. 27) शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात "शेतकरी एल्गार परिषद' घेतली जाणार असल्याचे धनाजी चुडमुंगे, शिवाजी माने आणि बी. जी. पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर प्रेस क्‍लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

धनाजी चुडमुंगे म्हणाले, ""राज्यात सरकार नसल्यामुळे मंत्री समितीची बैठक़ नाही. हंगामाचे धोरण ठरलेले नाही. अशा स्थिती साखर आयुक्तांनी आपल्या अधिकारात उसाचा हंगाम 25 नोव्हेंबरपासून सुरू करावा. सध्या शेती आणि शेतकरी अडचणीत आहेत. एकीकडे तोडणी, ओढणी, मशागत, खतांचे दर वाढत आहेत. दुसरीकडे उसाचा दर कमी होत आहे. उत्पादन खर्चात वाढ होत असताना उसाचा दर कमी होत आहे. जे ऊस दरामध्ये तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतात ते नूरा कुस्ती खेळत आहेत. दोन वर्षात ज्यांच्या तोडग्याने दर जाहीर झाला. ते मागणी दरावर काहीही बोलत नाहीत. तर यावर्षीच्या गळीत हंगामात ऊस दराची मागणी करत आहेत.'' 

थकीत एफआरपीसाठी लढा

""एकरकमी एफआरपी आणि प्रतिटन 350 रुपये मिळाले पाहिजे. हंगाम सुरू झाल्यानंतर आम्ही रस्त्यावर येत नाही. तर वर्षभर साखर आयुक्तांकडे शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीसाठी लढा देत आहे. त्यानूसार अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची थकीत रक्कम देण्याचे काम सुरू केले आहे.'' 

शिवाजी माने

तुम्ही सांगायचे, आम्ही ऐकायचे ही स्वाभिमानीची भूमिका

बी. जी. पाटील म्हणाले, ""कारखानदार आणि स्वाभिमानीकडून खेळल्या जाणाऱ्या नूरा कुस्ती बंद केली पाहिजे. कारखान्यांना एफआरपी द्यावाच लागणार आहे. यापेक्षा ज्यांच्याशी तोडगा काढला त्यांना मागील दराबाबत जाब विचारला पाहिजे. केवळ शेतकऱ्यांची फसवणूक करायची, सत्तेसाठी एक यायचे आणि त्यामुळे तुम्ही सांगायचे आणि आम्ही ऐकायची अशीच भूमिका स्वाभिमानीकडून घेतली जात आहे.''  यावेळी, श्रीकांत माने, सावन कांबळे, अविनाश पाटील, सुधाकर उदगावे, संभाजी पाटील उपस्थित होते. 

प्रा. मंडलिकांनी कायदा मोडला 
खासदार संजय मंडलिक यांच्या हमीदवाडा कारखान्याला अद्याप परवाना मिळालेला नाही. तरीही, त्यांनी कारखाना सुरू केला आहे. कारखान्यावर कारवाई झाली तर प्रतिटन 500 रुपये शेतकऱ्यांनाच फटका बसणार असल्याचेही बी. जी. पाटील यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FRP Plus 350 Rate Farmers Organisation Demand