esakal | निपाणीतील गांधी रुग्णालय ‘ऑक्सिजन’वर
sakal

बोलून बातमी शोधा

nipani

निपाणीतील गांधी रुग्णालय ‘ऑक्सिजन’वर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

निपाणी : सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी अजूनही, बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा असणे गरजेचे असताना येथील शासकीय महात्मा गांधी रुग्णालयात महिन्याभरापासून ऑक्सिजन पुरवठा होत नाही. त्यामुळे कोरोनासह इतर रुग्णांना बेळगाव अथवा कोल्हापूरला धाव घ्यावी लागत आहे. आरोग्य प्रशासनाने ऑक्सिजनची सोय करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा: 'सरकारला शेट्टींसोबतच्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?'

गतवर्षी आणि यंदाही कोरोना काळात शासकीय महात्मा गांधी रुग्णालयासह श्रीपेवाडी रोडवरील जोल्ले कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनची सेवा होती. दोन-तीन महिन्यांपासून कोरोना संसर्ग कमी झाल्याने दोन्ही ठिकाणचा ऑक्सिजन पुरवठा बंद आहे. अजूनही रुग्ण सापडत असल्याने त्यांना ऑक्सिजनची गरज असताना त्याअभावी खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे.

येथे खासगी रुग्णालयात ऑक्सिजनसाठी दररोज किमान ५ ते ८ हजार रुपये घेतात. खासगीतील उपचार परवडत नसल्याने बेळगाव सिव्हील अथवा कोल्हापूरमध्ये सीपीआर दवाखान्यास रुग्णांना नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. आरोग्य विभागाने तात्काळ महात्मा गांधी रुग्णालयात ऑक्सिजनची सोय करण्याची मागणी होत आहे.

"खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन सेवा परवडत नसल्याने महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल केले. तेथे ऑक्सिजनची सोय नसल्याने बेळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल केले." - अजित कळसन्नावर, रुग्णाचे नातेवाईक, बेनाडी

"कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने म्हणावा तसा ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा होत नाही. कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात सिलिंडर लागतात. केवळ प्रसूती शस्त्रक्रिया व इतर कामासाठी ऑक्सिजनचा वापर होत आहे."- डॉ. सीमा गुंजाळ, आरोग्याधिकारी, महात्मा गांधी रुग्णालय, निपाणी

loading image
go to top