नवीन वर्षात कामगार निर्मितीवर गारमेंट उद्योगाचा भर 

नवीन वर्षात कामगार निर्मितीवर गारमेंट उद्योगाचा भर 

सोलापूर : सलग चार वर्षे आंतरराष्ट्रीय गणवेश प्रदर्शन भरविलेल्या गारमेंट असोसिएशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोचण्यात मोठे यश मिळाले. या प्रदर्शनांमुळे जवळपास 20 हजार ग्राहकांशी उत्पादक जोडले गेले. यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादने घेतली जात असून, आता मिळालेल्या ऑर्डरींनुसार उत्पादने वेळेत पूर्ण करण्यासाठी नवीन कामगार निर्मितीवर असोसिएशनचा भर असणार आहे. 

गारमेंट हब होण्याच्या मार्गावर असलेल्या येथील गारमेंट उद्योगात कुशल कामगारांची कमी आहे. विडी उद्योगातील महिलांना गारमेंटचे प्रशिक्षण देऊन त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याच्या उद्देशाने गारमेंट असोसिएशनचा नवीन 2020 वर्षामध्ये ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा संकल्प आहे. केंद्र व राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या योजनेनुसार जुने विडी घरकुल, कुंभारी येथील गोदूताई परुळेकर विडी कामगार वसाहत, नई जिंदगी अशा कामगारबहुल चार-पाच ठिकाणी ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. कामगारांना प्रशिक्षण भत्ताही दिला जाणार आहे. 
2019 मध्ये गारमेंट क्‍लस्टरचे भूमिपूजन पार पडले. येत्या दोन-महिन्यांत बांधकाम पूर्ण करून 2020 वर्षअखेरपर्यंत क्‍लस्टर कार्यरत करण्याच्या दिशेने असोसिएशनचे प्रयत्न आहेत. गारमेंट उद्योगातील कामगारांच्या आरोग्याची काळजीही असोसिएशन घेत असते. 2019 मध्ये नेत्रशिबिर आयोजित करण्यात आले. 2020 मध्येही आरोग्य शिबिरे राबवली जाणार आहेत. 

दक्षिण भारतात होणार प्रदर्शन 
सलग चार वर्षे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमुळे अनेक 20 हजार ग्राहकांशी आम्ही जोडलो गेलो. आता प्रेझेंटेशनवर भर दिला जाणार आहे. 2020 मध्ये दक्षिण भारतात प्रदर्शनाचे नियोजन आहे, अशी माहिती श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे सहसचिव प्रकाश पवार यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितली. 

यंत्रमाग उद्योगाचे लक्ष्य मार्केटिंग, नवतंत्रज्ञानावर 
जगात नावाजलेल्या सोलापुरी चादरींसह आता यंत्रमाग उद्योगात टेरी टॉवेलच्या निर्यातक्षम उत्पादनांना वेग येत आहे. नेहमी नुकसानीत जाणाऱ्या व नकारात्मक वातावरणामुळे मरगळ आलेल्या यंत्रमाग उद्योगात सप्टेंबर महिन्यात झालेल्या "व्हायब्रंट टेरी टॉवेल' या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामुळे या उद्योगात उत्साह संचारला आहे. या पहिल्याच प्रदर्शनामुळे अनेक देशांतर्गत व विदेशी खरेदीदारांशी जोडल्या गेल्यानंतर आता या उद्योगाचे लक्ष्य 2020 या नूतन वर्षात मार्केटिंग व नवतंत्रज्ञानावर राहणार आहे. 

यंत्रमाग उद्योगात नवीन सुशिक्षित युवा पिढी कार्यरत आहे. व्हायब्रंट टेरी टॉवेल प्रदर्शनात युवा उद्योजकांची फळी उत्साहाने कार्यरत होती. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देश-विदेशातील ग्राहकांशी कनेक्‍ट झाले. आता त्यांच्याकडून डिजिटलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचे जाळे विणले जात असून, मार्केटिंगवर जास्त भर दिला जाणार आहे. नवीन वर्षात या उत्साही तरुण उद्योजकांसह कारखानदारांना स्वावलंबी व सक्षम बनवण्यासाठी मार्केटिंग, मॅनेजमेंट, नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार उत्पादने घेणे, देशांतर्गत व परदेशी ग्राहकांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करणे यावर भर दिला जाणार आहे. यंत्रमाग उद्योगातील उत्पादनांचे मार्केटिंग, दर्जेदार उत्पादनांसाठी टेक्‍निकल सत्र घेतले जाणार असून, क्वालिटी मॅनेजमेंटवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com