सोलापूरचा 'महा'भ्रमनिरास

The Great Depression of Solapur
The Great Depression of Solapur

सोलापूर : राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला सोलापूर जिल्हा... क्षेत्रफळात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा... दक्षिण काशी पंढरपूर, राज्यातील भाविकांसाठी प्रिय असलेल्या श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यात... राज्यातील सर्वांत विस्तीर्ण आणि मोठे असलेले उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात... महाराष्ट्रातील एकमेव एनटीपीसी प्रकल्प सोलापूर जिल्ह्यात... येवढ्या सगळ्या राज्यातील महत्वाच्या गोष्टी सोलापूरशी निगडीत असतानाही आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला भला मोठा भोपळा मिळाला आहे. असे का? आम्हाला राज्याच्या राजकारणातून डावलले गेले असल्याची भावना सोलापूरकरांमध्ये आहे. हे महाविकास आघाडीच्या भल्याचे नाही, हे मात्र नक्की.

हेही वाचा : ...हा तर विकसनशील सोलापूरवर अन्यायच!
यापेक्षा वाईट काहीही नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. मात्र, जिल्ह्याच्या पदरी या मंत्रिमंडळ विस्तारातून निराशाच आली असल्याने सोलापूरला का डावलले, असा सवाल येथील महिला, तरूणाईपासून वृद्धांपर्यंत सर्व जण विचारत आहे. तब्बल 11 आमदार राज्याला देणारा सोलापूर जिल्हा आहे. यातील सहा आमदार हे महाविकास आघाडीचे असताना सोलापूर मंत्रिमंडळात साधे राज्यमंत्रीपदही मिळू नये, यापेक्षा वाईट ते काहीही नाही, अशी भावना जिल्ह्यात आहे.
राज्याच्या राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणात सोलापूर जिल्ह्याची नेहमीच महत्वाची भूमिका राहिली आहे. राज्यातील एक महत्वाचा जिल्हा म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते. सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी दोन्ही महत्वाची पदे एका जिल्ह्याकडे असण्याचा विक्रम सोलापूरच्या नावावर आहे. विधानसभेचे तब्बल 11 आमदार असलेल्या सोलापूर जिल्ह्याला महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात एकही मंत्रीपद मिळालेले नाही, हे जितके धक्कादायक आहे, त्यापेक्षा सोलापूरकरांच्या स्वाभिमानाला लागलेली ही ठेच आहे, अशी भावना जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय वर्तूळातून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : मंत्रीमंडळ विस्तारानंतर ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्याकर्त्यांमध्ये नाराजी
जिल्ह्यावर विशेष प्रेम

महाविकास आघाडी सहा, भाजप चार तर एक अपक्ष अशी सध्याची सोलापूर जिल्ह्याची राजकीय स्थिती आहे. आमदार प्रणिती शिंदे, आमदार बबनराव शिंदे, आमदार भारत भालके व आमदार संजय शिंदे यांच्या नावाची मंत्रीपदासाठी सुरवातीपासून चर्चा होती. मात्र, ही चर्चा सत्यात उतरली नाही. सोलापूर हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना माननारा जिल्हा आहे. पवार यांचेही या जिल्ह्यावर विशेष प्रेम राहिले आहे. श्री. पवार यांनी सोलापूरचे पालकमंत्रीपदही संभाळले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून ते एकवेळ खासदार झाले आहे. असे असतानाही राष्ट्रवादीच्या कोट्यातून सोलापूरला मंत्रीपद मिळाले नाही, याचे आश्‍चर्य वाटत आहे. अलिकडच्या काळता बदलत्या राजकीय समीकरणामध्ये सोलापूर जिल्ह्याने श्री. पवार यांची काही प्रमाणात साथ सोडली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोलापूरला नाकारले की काय, अशीही चर्चा आता दबक्‍या आवाजात सुरू आहे.
2014 मध्ये तीन आमदार असलेली कॉंग्रेसची आमदार संख्या 2019 मध्ये एकवर आली आहे. आज जिल्ह्यात कॉंग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना तरी मंत्रीपद मिळेल, असे वाटत होते. तशी जिल्हावासियांची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षाही फोल ठरली आहे. लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या पदरी पराभव येत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कन्या प्रणिती मात्र चांगल्या मतांनी विजयी होत आहे. हे प्रणिती यांचे स्वकर्तृत्वच आहे, त्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊन न्याय देणे अपेक्षित होते. मात्र, नेहमीप्रमाणे कॉंग्रेस नेतृत्वाने कार्यकर्त्यांच्या या इच्छेला ठोकरले आहे.
हेही वाचा : खेकड्याने फोडलेल्या धरणात मंत्रीपद वाहुन गेले
शिवसेना नेतृत्त्वाने केले दुर्लक्ष

सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी शिवसेनेचे सहा आमदार होते. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत ही संख्या एकवर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला उभारी घेण्यासाठी एक मंत्रीपद मिळणे गरजेचे होते. मात्र, सुरवातीपासूनच शिवसेना नेतृत्वाचे याचा विचार केला नसल्याचे एकूण घडामोडीवरून दिसून येते. यात आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परंडा येथून आमदार असलेल्या आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. आमदार सावंत यांना हमखास मंत्रीपद मिळणार, अशी चर्चा सरकार स्थापन झाल्यापासून होती, मात्र सांवतांना धक्का मिळाला असल्याने सोलापूर जिल्ह्याकडे शिवसेना नेतृत्वाने दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पवारांची क्रेझ आणि सोलापूर जिल्हा
2019 ची विधानसभा निवडणूक ही "वन मॅन आर्मी'प्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पावर यांनी एकहाती गाजवली. सातारा येथील श्री. पवार यांच्या सभेने तर या प्रचार कॅम्पेनचा कळस गाठला होता. मात्र, या प्रचार कॅम्पेनची खरी सुरवात ही सोलापूर येथील सभेपासून झाली होती. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व मोहरे भाजप व शिवसेनेत जात असतानाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर येथे झालेल्या श्री. पवार यांच्या सभेला तरूणाईने अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला होता आणि येथून खऱ्या अर्थाने श्री. पवार यांची राज्याच्या तरूणाईमध्ये क्रेझ निर्माण झाली होती. असे सगळे असतानाही राष्ट्रवादीने जिल्ह्याला मंत्रीमंडळात संधी दिली नसल्याने एक प्रकारे नाराजीचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com