निपाणी येथे गॅस गळतीने आग; पाच जण गंभीर जखमी

Gas Cylinder Leak Incidence In Nipani Five Injured
Gas Cylinder Leak Incidence In Nipani Five Injured

निपाणी ( बेळगाव ) - चिक्कोडी रोडवरील जत्राटवेसमधील चर्मकारगल्लीत गॅस गळतीने भडका उडाला. त्यात पाच जण भाजून गंभीर जखमी झाले. शनिवारी (ता. 14) रात्री 12 वाजता घडलेल्या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. दयानंद दशरथ ताते (वय 55), पुष्पा दयानंद ताते (50), नम्रता हराळे यांच्यासह श्रीनिधी हराळे व सोहम हराळे या चिमुकल्यांचा जखमींमध्ये समावेश आहे. घटनेची नोद येथील श्री बसवेश्वरचौक पोलिस स्थानकात झाली आहे.

याबद्दल माहिती अशी, ताते कुटुबीयांच्या घरातील गॅस किटला बारीक गळती होती. ते ताते कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही. शनिवारी रात्री ते झोपी गेल्यावर घरात गॅस साठला. दरम्यान देव्हाऱ्यासमोर दिवा लावलेला असल्याने गॅसने भडका घेतला. ताते कुटुंबीय स्वयंपाक घरातच झोपले होते. यावेळी भडका घेतलेल्या आगीने ताते कुटुंबीयांना घेरले. आग लक्षात येताच सर्वजण जागे झाले. यावेळी आगीचे लोट घरावरील छतावर पोचले. कौलांच्या खाली असणारे प्लास्टीकचे छत वितळून ते चिमुकल्यांसह ताते कुटुंबीयांच्या अंगावर पडल्याने त्यांना गंभीर इजा झाली.

संसारोपयोगी साहित्याचे नुकसान

प्रसंगावधान साधन दयानंद ताते यांनी गॅस सिलिंडरचा प्रवाह बंद केला. सर्वांच्या सहकार्याने तातडीने सर्व जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेत घरावरील कौले फूटून गेली आहेत. भांडी, अंथरूण व अन्य संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री व आज (ता. 15) घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक बी. जी. सुब्बापूरमठ व पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.

उरूसाला आलेल्या चिमुकल्यांना भाजल्याने हळहळ 

दयानंद यांच्या कन्या नम्रता हराळे या उरुसानिमित्त दोन मुलांसह माहेरी आल्या होत्या. त्यांच्यासोबत असणाऱ्या सोहम व श्रीनिधी या चिमुकल्यांना देखील भाजले आहे. चिमुकल्यांसह अन्य जखमींना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com