esakal | पावसाळ्यातही सौर ऊर्जेतून ६ लाख युनिट वीज निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

solar energy

पावसाळ्यातही सौर ऊर्जेतून ६ लाख युनिट वीज निर्मिती

sakal_logo
By
घनशाम नवाथे : सकाळ वृत्तसेवा

सांगली : पारंपरिक ऊर्जा साधनावरील भार कमी करण्यासाठी शासनातर्फे सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत आवाहन व जागृती केली जात आहे. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. जिल्ह्यातील ७८५ ग्राहकांनी सौर ऊर्जा यंत्रणा बसवली आहे. त्यापासून प्रतिमहिना १७ लाख युनिट वीज निर्मिती शक्य आहे. सध्या पावसाळ्यात ६ लाख १० हजार युनिटपर्यंत वीज निर्मिती केली जात आहे. सौर ऊर्जेपासून वीजनिर्मितीमुळे संबंधितांच्या वीज बिलाची रक्कमही कमी होऊ लागली आहे.

हेही वाचा: इचलकरंजी: गणेशमूर्तींचा तुटवडा, मंडळांची धावाधाव

वीज निर्मितीसाठी कोळसा, तेल, नैसर्गिक वायू आदी साधनांचा वापर केला जातो. त्यामुळे बऱ्याचदा वीजनिर्मितीसाठी आवश्‍यक साधनांचा तुटवडा भासला, तर वीज निर्मितीवर त्याचा परिणाम होतो. परंपरागत साधनांवरील ताण कमी करण्यासाठी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेतून वीज निर्मितीची यंत्रणा बसवण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून जागृती होत आहे. या यंत्रणेमुळे अनेक ग्राहकांची वीज बिले शुन्यावर आली आहेत. नाममात्र बिल महिनाकाठी येत असल्यामुळे परंपरागत विजेची बचत होऊ लागली आहे. सध्या दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. वीज बिलासाठीचे विविध करही वाढत आहेत. त्यामुळे बिलाचा आकडाही वाढत आहे. यातून दिलासा मिळण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर आवश्‍यक बनत आहे. केंद्र सरकारने देखील त्यासाठी ग्राहकांना ४० टक्केपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: कृष्णा काठावरील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

३ लाख युनिट विजेची विक्री

जिल्ह्यातील ७८५ वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा संकलन यंत्रणा बसवली आहे. त्यांची १७ लाख युनिट इतकी वीज निर्मितीची क्षमता आहे. पावसाळी वातावरणात ऑगस्ट महिन्यात त्यांनी ६ लाख १० हजार युनिट वीज निर्मिती केली. त्यापैकी ३ लाख युनिट वीज महावितरणला दिली. तर महावितरणकडून त्यांनी ६ लाख ५० हजार युनिट वीज वापरली.

घरगुती ग्राहकांना ४० टक्के अनुदान

घरगुती ग्राहकांना छतावर एक ते तीन किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. तीन किलोवॅटपेक्षा अधिक असेल तर २० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होते. तसेच नेट मिटरींगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेरीस शिल्लक वीज विकतदेखील घेतली जाते. दरमहा शंभर युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेतून दरमहा साधारणपणे ५५० रूपये बचत होऊ शकते.

हेही वाचा: रायबाग पोटनिवडणूक: सासूच्या जागेवर सूनेची बाजी

देखभालीसह खर्च इतका

पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह सौर ऊर्जा निर्मितीसाठी एक किलोवॅटला ४६ हजार ८२० रूपये, एक ते दोन किलोवॅटसाठी ४२ हजार ४७० रूपये, दोन ते तीन किलोवॅटसाठी ४१ हजार ३८० रूपये, तीन ते दहा किलोवॅटसाठी ४० हजार २९० रूपये; तसेच दहा ते १०० किलोवॅटसाठी ३७ हजार २० रूपये प्रतिकिलोवॅट इतकी किंमत जाहीर केली आहे. साधारणपणे यंत्रणा उभारणीच्या खर्चाची तीन ते पाच वर्षात परतफेड होते अशी माहिती महावितरणच्या जनसंपर्क विभागाने दिली.

loading image
go to top