गुड न्यूज.. कांद्याला मिळाला चक्क 14 हजार 200 रुपयांचा उच्चांकी दर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पंढरपूर : कांद्याच्या दरवाढीने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असले, तरी कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत मात्र आनंदाश्रू तरळताना दिसून येत आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता. 5) झालेल्या कांदे सौदे बाजारात ईश्‍वरवठार (ता. पंढरपूर) येथील शेतकरी प्रवीणसिंह चौगुले यांच्या उच्च प्रतीच्या कांद्याला प्रती क्विंटल 14 हजार 200 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. बाजार समितीच्या इतिहासातील हा सर्वोच्च दर मानला जात आहे.

पंढरपूर : कांद्याच्या दरवाढीने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असले, तरी कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत मात्र आनंदाश्रू तरळताना दिसून येत आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता. 5) झालेल्या कांदे सौदे बाजारात ईश्‍वरवठार (ता. पंढरपूर) येथील शेतकरी प्रवीणसिंह चौगुले यांच्या उच्च प्रतीच्या कांद्याला प्रती क्विंटल 14 हजार 200 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. बाजार समितीच्या इतिहासातील हा सर्वोच्च दर मानला जात आहे.

हे ही वाचा... यामुळे मागणी वाढली मोड आलेल्या कडधान्यांना

बाजारात सुमारे तीन हजार पिशव्या कांद्याची आवक झाली. सरासरी शेतकऱ्यांना सात हजार रुपयांचा भाव मिळाला. आज एका दिवसात येथील बाजार समितीमध्ये एक कोटी रुपयांची उलाढाल झाली. 

आधी दुष्काळ, त्यानंतर महापूर आणि मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्यासह शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच कांद्याचे आगार असलेल्या नाशिक आणि परिसरातील कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटल्याने दराने उसळी घेतली आहे. राज्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याने शंभरी पार केली आहे. कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातून कांदा गायब झाला आहे. 

हे ही वाचा... आता शेतकऱ्यांना आले `अच्छे दिन`

एकीकडे कांद्याच्या चढ्या दराने गृहिणी आणि ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आले असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र चांदी झाली आहे. कांद्याला कधी नव्हे इतका भाव मिळू लागल्याने सध्या शेतकरी देखील खुशीत आहेत. आज येथील कांदा सौदेबाजारात पंढरपूरसह शेजारील अनेक तालुक्‍यांतून कांद्याची सुमारे तीन हजारांहून अधिक पिशव्यांची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 10 हजारांपासून ते 14 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला तर कमी प्रतीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून ते आठ हजार 200 रुपये असा दर मिळाला. बाजारात सरासरी सात हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. कांद्याचे दर वाढल्याने येथील बाजार समितीमध्ये प्रथमच सर्वाधिक एका दिवशी एक कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती बाजार समितीचे उपसभापती विवेक कचरे यांनी सांगितली. यावेळी संचालक सुरेश आगवणे, अजय जाधव, सचिव कुमार घोडके, आडतदार बाळासाहेब शेंबडे आदी उपस्थित होते. 

एक कोटीची उलाढाल
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची सुमारे तीन हजार पिशव्यांची आवक झाली. बाजारात सर्वाधिक 14 हजार 200 रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. सरासरी सात हजार रुपयांचा भाव मिळाला. कांद्याचे भाव वाढल्याने बाजार समितीमध्ये आज एका दिवशी जवळपास एक कोटीची उलाढाल झाली. 
- दिलीप घाडगे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर 

मागणीमुळे वाढले दर
येथील कांदे सौदेबाजारात सर्वाधिक 14 हजार 200 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. अवकाळी पावसामुळे सडलेल्या कांद्यालाही प्रती क्विंटल एक हजार 200 रुपये दर मिळाला. आवक कमी आणि मागणी वाढल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. 
- सुभाष मस्के, कांदा खरेदी व्यापारी, पंढरपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news .. Onions got a high of Rs 14,200