खुशखबर! सोलापूरला येणाऱ्या रेल्वेगाड्या येताहेत 15 मिनिटे आधीच!

अशोक मुरूमकर
रविवार, 1 डिसेंबर 2019

- सोलापूर-पुणे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम आहे प्रगतिपथावर
- विद्युतीकरणाच्या कामाला वेग
- क्रॉसिंगसाठी लागणाऱ्या वेळेची बचत

सोलापूर : पुणे किंवा मुंबईकडून सोलापुरात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! कारण हुतात्मा, इंद्रायणी एक्‍स्प्रेससह अपवाद वगळता सर्व गाड्या वेळेच्या आधीच सोलापुरात पोचत आहेत. त्यामुळे किमान 10 ते 15 मिनिटांची बचत होत आहे. दुहेरीकरणामुळे क्रॉसिंगला जाणारा वेळ आता कमी झाला आहे. दुपारी 1.30 वाजता येणारी इंद्रायणी वेळेच्या आधी फलाटावर येत आहे. असेच "हुतात्मा'चे सुद्धा आहे.

हेही वाचा : वाढदिवस साजरा करण्याचे "यांचे' आदर्श उदाहरण

मध्य रेल्वेच्या सोलापूर ते पुणे मार्गावरील बहुचर्चित दुहेरीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. काम पूर्ण झाले नसले तरी आतापर्यंत झालेल्या कामामुळे रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळत आहे. जेऊरपासून सोलापूरदरम्यान आता गाड्या क्रॉसिंगला थांबण्याचेही प्रमाण कमी झाले आहे. नेहमी लेटमार्क लागणारी पॅसेंजरसुद्धा अपवाद वगळता वेळेवर धावत आहे. मुंबई- पुणे- सोलापूर इंद्रायणी एक्‍स्प्रेस व सोलापूर- पुणे हुतात्मा एक्‍स्प्रेस या गाड्या वेळेच्या आधीच स्थानकावर येत आहेत. याशिवाय इतर काही गाड्यांच्या वेळेत सुद्धा 10 ते 15 मिनिटांची बचत होत आहे.

हेही वाचा : यामुळे होणार नियोजन कार्यालय लोकाभिमुख

विद्युतीकरणाच्या कामाला वेग
मध्य रेल्वेच्या दौंड ते सोलापूर दरम्यानच्या विद्युतीकरणाच्या कामाला सध्या वेग आला आहे. भाळवणी ते माढा स्थानकादरम्यान विद्युतीकरणासाठी खांब उभे केले आहेत. त्याच्या जोडणीचे कामसुद्धा सुरू आहे. भाळवणी ते कुर्डुवाडीदरम्यान काही ठिकाणी विद्युत वाहिन्याही टाकलेल्या आहेत.

 

स्थानकाची कामे सुरू
मध्य रेल्वेच्या दौंड ते सोलापूर दरम्यानच्या रेल्वे स्थानकावरील कामेही सुरू आहेत. जेऊर येथील स्थानकावर फलाट क्रमांक दोनचे नव्याने काम सुरू आहे. यापूर्वी येथे एकाच बाजूला प्रवाशांना उतरावे लागत होते. अनेकदा पुणे आणि सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्या एकाचवेळी स्थानकावर थांबत तेव्हा प्रवाशांना जीव धोक्‍यात घालून जावे लागत होते. मात्र फलाट क्रमांक दोनचे काम झाल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. येथे भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलाचे कामही सुरू आहे. भाळवणी ते केम दरम्यानचे गेट देखील लवकरच बंद होण्याची शक्‍यता आहे. इतर स्थानकाची सुद्धा कामे सुरू आहेत.

हेही वाचा : बालनाट्य स्पर्धेसाठी राज्यात होणार नव्याने पाच केंद्रे

"गाड्यांना थांबा द्या'
दुहेरीकरणामुळे रेल्वे गाड्या स्टेशनवर निर्धारित वेळेच्या आधी पोचत आहेत. अशा गाड्यांना दरम्यानच्या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्टेशनवर 1 ते 2 मिनिटांचा प्रवासी थांबा मिळण्याचा प्रस्ताव आवश्‍यक. तो माहितीसह सोलापूर विभागाने रेल्वे मंत्रालयाकडे पाठवून देणे गरजेचे आहे. यापूर्वी एकेरी मार्ग असल्याने प्रवासी गाड्यांना काही स्थानकावर थांबा देण्याबाबत रेल्वे प्रशासन गांभीर्याने घेत नव्हते. तो दीर्घकालीन प्रश्‍न सोडवण्यासाठी आता मदत होणार आहे. यासाठी खासदारांनी संसदेमध्ये पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
- संजय पाटील, जिल्हाध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news trains arriving in solapur 15 minutes in advance