हरवलेल्या आजी सापडल्या व्हॉटस्‌ अप्‌ व फेसबुकमुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

पारूआजी इंदापूर परिसरात प्रवासातून अचानक उतरल्या आणी तेथेच बसून राहिल्या. त्यानंतर तेथील स्थानिकांनी त्यांच्याकडून थोडी माहिती विचारून हि पोस्ट त्यांच्या फोटोसह व्हायरल केली.

पानगाव (बार्शी - सोलापूर) : शुक्रवारी सकाळी बार्शी तालुक्‍यासह व तालुक्‍यातील नोकरी व व्यवसायानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या नागरिकांच्या मोबाईलवर एकाच मेसेजने गर्दी केली. मेसेज असा होता कि या आजीला त्यांच्या मुलाने देवाला जायच आहे चल म्हणून आणले आहे, आणी इंदापूर बायपासला सोडले आहे. माझी सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा व त्या आजीला न्याय मिळवून द्या. तसेच गाव विचारले तर आजी पानगाव (ता. बार्शी) सांगते. तसेच चार मुले एक मुलगी आहे असे म्हणते, शिवाय आजीचा एक मोबाईलवर काढलेला फोटोही मेसेजवर व्हायरल झाला होता. व्हाटसअप फेसबुकच्या या मेसेजने हजारो लोकापर्यंत हि माहिती केंव्हाचीच पोहचवली होती. मग आजीच्या इंदापुरपर्यंत पोहोचण्याच्या कारणाचा उलगडा झाला. 

हे ही वाचा... धक्कादायक...! पैशासाठी मुलाने केला आईचा खून

याबाबत त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेली माहिती अशी की,पारूबाई उर्फ पार्वती भीमराव रणशिंग (वय 68, पानगाव) येथील असून त्यांना चार मुले आहेत. हल्ली त्याची तीन मुले रोजगारासाठी हडपसर (पुणे) येथे कामाला आहेत. दयानंद,शिवाजी व हनुमंत यांच्यासमवेत हडपसर पुणे परिसरात त्या राहतात. गुरुवारी सायंकाळी रणशिंग कुटुंबातील सर्वजण नेहमीप्रमाणे आपापल्या कामावरून घरी आले पण पारूआजी घरी दिसून आल्या नाहीत. शोधाशोध सुरु केली पण व्यर्थच गेली. शेवटी मुलांनी पुणे पोलिसात पारुआजी हरवल्याचे कळवले. 

हे ही वाचा.... माढ्यात सापडले टिपू सुलतानच्या काळातील नाणे

दरम्यान व्हाटसअप फेसबुकची पोस्ट इंदापूर परिसरातून इतरांसह त्यांच्या मुलांपर्यत देखील पोहचली आणि त्या इंदापूर परिसरात असल्याची माहिती मुलांना मिळाली. दरम्यान पुण्याहून कोणालाही न सांगता पानगावच्या दिशेने निघालेल्या व थोडे मानसिक संतुलन बिघडलेल्या या पारूआजी इंदापूर परिसरात प्रवासातून अचानक उतरल्या आणी तेथेच बसून राहिल्या. त्यानंतर तेथील स्थानिकांनी त्यांच्याकडून थोडी माहिती विचारून हि पोस्ट त्यांच्या फोटोसह व्हायरल केली. या पोस्टमधील फोटोची रणशिंग कुटुंबियांना खात्री पटली व त्यांच्या मुलांनी शुक्रवारी इंदापूर पोलिसांना संपर्क साधत रात्री उशिरा इंदापूर गाठले. शेवट येथून त्यांना तेथून हडपसर येथे त्यांच्या घरी नेण्यात आले. एकूणच या व्हाटसअप फेसबुकच्या हजारो पोस्टमुळे पारुआजी व्यवथित घरी पोहोचल्या हे मात्र त्रिवार सत्य. परुआजीचे मानसिक संतुलन थोडे बिघडल्याने हि घटना घडली असल्याचे त्यांच्या मुलांनी सांगितले. या सर्व प्रकारांनंतर शेवटी त्यांनी पोलिसांसह सर्वाचेच तसेच व्हाटसअप फेसबुकच्या वापरकर्त्याचे देखील आभारदेखील मानले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandmother found out Because of WhatsApp and Facebook