भीमराया घे तुझ्या सर्व लेकरांची वंदना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

"जरी संकटाची काळरात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती.' "अरे सागरा शांत हो जरा, भीम माझा निजला येथे शांत हो जरा' अशा विविध भीमगीतांनी नागरिक भारावून गेले होते.

नगर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटना व राजकीय पक्षांतर्फे मार्केट यार्डसमोरील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भीमगीते, विविध समाजोपयोगी कार्यक्रम या वेळी झाले. 

सकाळीच अभिवादनाला साधारणतः एक हजार नागरिक जमा झाले होते. अभिवादन झाल्यानंतर सकाळी नऊ वाजता भीमशाहीर दादासाहेब साळवे यांची भीमगीते झाली. त्यात "जरी संकटाची काळरात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती.' "अरे सागरा शांत हो जरा, भीम माझा निजला येथे शांत हो जरा' अशा विविध भीमगीतांनी नागरिक भारावून गेले होते. डॉ. आंबेडकर यांची पुस्तके, मूर्ती, दिनदर्शिका आदी वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. तरुण, तरुणी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सेल्फीही घेत होत्या. आठ ते दहा पोलिसांचा चौकात बंदोबस्त होता. 

 

हेही वाचा ः महाराष्ट्राच्या रणजी संघात नगरचा ताेफखाना

महामानवाला अभिवादन 
शहरातील विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम झाले. मार्केट यार्ड चौकातील आंबेडकर चौकात मंडप उभारण्यात आला होता. अभिवादनासाठी जिल्हाभरातून लोकांची रीघ लागली होती. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उबेद शेख, परिमल निकम, सुरेश बनसोडे, अभिजित खोसे, अजय दिघे, महेश भोसले, अजय साळवे आदी उपस्थित होते. शिवसेनेतर्फेही अभिवादन करण्यात आले. नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम, गणेश कवडे, श्‍याम नळकांडे, संजय शेंडगे, संध्या मेढे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर चौकात आज सकाळी सहापासून सायंकाळी पाचपर्यंत जिल्हाभरातून नागरिक येत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Greetings to Babasaheb Ambedkar