घडलंच असं, हसावं की रडावं... गुरूजीने पोलिस इन्सपेक्टरला गंडवले, आकडा एेकून येईल भोवळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

 कारण फसवणूक करणारी व्यक्ती प्रतिष्ठित आहे. आणि फसवणूक झालेली तर गुन्हेगारी विश्व कोळून प्यायलेल्या खात्यात होती.

पाथर्डी : दररोज कोणी ना कोणी व्यक्ती सर्वसामान्य माणसाला गंडा घालीत असतो. त्याच्या अज्ञानाचा फायदा घेत फसवित असतो. परंतु पाथर्डीत अजबच घडलंय. कोणी कोणाला गंडवलंय हे वाचलं तर तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही... कारण फसवणूक करणारी व्यक्ती प्रतिष्ठित आहे. आणि फसवणूक झालेली तर गुन्हेगारी विश्व कोळून प्यायलेल्या खात्यात होती.

त्याचं घडलंय असं...नाशिक येथील संकल्पसिद्धी माऊली बॅंकेत पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिषाने शहरातील निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षकास गंडा घातला आहे. विशेष म्हणजे फसवणारी व्यक्ती गुरूजी आहे.  

शिक्षक कृष्णा भिकाजी वारे (रा. आनंदनगर, पाथर्डी) व विष्णू भागवत (रा. नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा - ट्रम्प तात्या अन मेलानिया काकी आल्यात परत

याबाबत निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती दशरथ खेडकर (वय 82) यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. निवृत्ती खेडकर शहरातील आनंद नगर भागात राहतात. त्याच भागात निलंबित शिक्षक कृष्णा वारे राहत होता. त्याने नाशिकच्या विष्णू भागवत याच्याशी खेडकर यांची ओळख करून दिली.

नाशिक येथील संकल्पसिद्धी बॅंकेत पैसे गुंतविल्यास दरमहा दोन टक्के व्याज मिळेल, असे त्याने सांगितले. त्यानुसार खेडकर यांनी संकल्पसिद्धी बॅंकेत 20 लाख रुपये गुंतविले. काही दिवस व्यवहार चालल्यावर खेडकर यांनी ते पैसे काढुन घेतले. पुन्हा दोन वर्षांपूर्वी कृष्णा वारे खेडकर यांच्याकडे आला व म्हणाला पैठणीच्या प्रॉडक्‍टमधे पैसे गुंतवा, चांगला परतावा मिळेल. पण मी संकल्पसिद्धी बॅंकेत पैसे गुंतवतो, असे सांगितले व बॅंकेच्या खात्यावर 17 आक्‍टोंबर 2018 रोजी पाठविले. त्यानंतर काही दिवसात वारे पुन्हा घरी आला व मला पाच लाख रुपये आणखी गुंतवा, असे सांगुन ते रोख घेवुन गेला.

त्याने ते पाच लाख रुपये विष्णू भागवत याच्याकडे दिल्याचे फोन करुन कळविले. सुरवातीला काही दिवस माझ्या महाराष्ट्र बॅंकेच्या खात्यावर पाच ते सहा लाख रुपये संकल्पसिद्धी बॅंकेच्या खात्यातून आले. पण पैसे येणे बंद झाले. मग वारे व भागवत यांच्याकडे पैशाची विचारणा केली असता, मला उडवाउडवीची उत्तरे दिली व पैसे देऊ असे सांगितले. 

जाणून घ्या - इंदोरीकरांबाबत हे घ्या पुरावे

अनेक दिवस पाठपुरावा केल्यावर मला पुढची तारीख टाकून नाशिकच्या संकल्पसिद्धी बॅंकेचा 20 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. परंतु नंतर मला समजले की विष्णू भागवत याची संपत्ती व बॅंक खाते सील करण्यात आले आहे.

माझी विष्णू भागवत नाशिक व कृष्णा भिकाजी वारे रा.आनंदनगर, पाथर्डी यांनी संगनमताने विश्वासघात करुन 25 लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी निवृत्ती खेडकर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड तपास करीत आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guruji cheats the police inspector