आक्रीत झालं राव ः यांना कोरोना पावलाय

विनायक दरंदले
Sunday, 19 April 2020

शनिशिंगणापुर दर्शन बंद झाल्याने बेकार झालेले अनेक युवक या व्यवसायातून सध्या हात 'मावा स्पेशल ' म्हणून येथील काही पानटप-या प्रसिद्ध आहे. हे व्यावसायिक सध्या भाडोत्री खोलीत मध्यरात्री यंत्राद्वारे मावा तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवत आहेत.

सोनई: कोरोनाच्या भीतीने सगळे जग हादरून गेले आहेत. लॉकडाउनमुळे सगळेच धंदे बसले आहेत. मात्र, अशा आणीबाणीच्या स्थितीतही या लोकांची रोज चांदी होत आहे. नव्हे सोनं होत आहे. त्यामुळे त्यांना कोरोना पावला असेच बाकीचे लोकं म्हणत आहेत. कारण लाखो रूपयांची त्यांची कमाई आहे.

सोनई, घोडेगाव, वडाळा, चांदे व परीसरातील सर्व पानटप-या इतर दुकानाप्रमाणे बंद असल्या तरी मावा व गुटख्याची विक्री मोबाईल संपर्कातून सध्या सुरु आहे. किराणा दुकान, घर व शेतातील वस्तीवर एजंटा मार्फत विक्रीचे रॅकेट सध्या कार्यरत आहे. शासनाने गुटखा, मावा, जर्दा व सुगंधित तंबाखूवर बंदी घातली असली तरी चुरा सुपारीसह माव्याच्या सर्व जर्दा एका किराणा दुकानात राजरोस विक्री होत असल्याचे समजते.

हेही वाचा - याला नीचपणा म्हणायचं नाही तर काय

राज्य सरकारची गुटखाबंदी फक्त कागदावरच असल्याचे सध्यातरी जाणवत आहे. सध्या सर्वत्र कच्च्या आणि भाजक्या सुपारीच्या जर्दायुक्त माव्याची विक्री सुरु आहे. मोठी आर्थिक उलाढाल असल्याने या रॅकेटमध्ये व्यापा-यांसह अनेक युवक कार्यरत आहेत. लाॅकडाऊनच्या नावाखाली मावा पुडीचा दर दुपटीने वाढविण्यात आली आहे.

शनिशिंगणापुर दर्शन बंद झाल्याने बेकार झालेले अनेक युवक या व्यवसायातून सध्या हात 'मावा स्पेशल ' म्हणून येथील काही पानटप-या प्रसिद्ध आहे. हे व्यावसायिक सध्या भाडोत्री खोलीत मध्यरात्री यंत्राद्वारे मावा तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवत आहेत. विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा ठेवली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांनी ही बाब लक्षात घेवून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

सध्या सोनई व शनिशिंगणापुर पोलिस ठाण्याच्या वतीने गावठी हातभट्ट्या उध्वस्त केल्या जात आहेत. मात्र, परीसरात परमीट रुम चालकाच्या वतीने दुप्पट पैसे घेवून होत असलेली दारुची घरपोच सेवा व गुटखा व मावा विक्रीवर कारवाई होत नसल्याबद्दल ग्रामस्थांत नाराजीचा सूर आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha business in Sonai