कष्ट शेतकऱ्याचे, हलगर्जीपणा ट्रॅक्टर चालकांचा | farmers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कष्ट शेतकऱ्याचे, हलगर्जीपणा ट्रॅक्टर चालकांचा!

कष्ट शेतकऱ्याचे, हलगर्जीपणा ट्रॅक्टर चालकांचा!

चिक्कोडी : वर्षभर आपल्या ऊस पिकाला जपताना शेतकरी हजारो रुपयांचा खर्च करून ऊस पिकवतात. वायफळ खर्चाला आळा घालून विविध सण, समारंभ कार्यक्रम आधीचे नियोजन उसाच्या बिलातून होईल अशी आशा बाळगतात. कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होतात. तोडणीच्या माध्यमातून कारखान्याला ऊस लवकर पोहोचावा, याचे नियोजन सुरू होते. मात्र ट्रॅक्‍टर चालकांचा हलगर्जीपणा काहीवेळा शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल न जाणता वाटेतच उसाची नासाडी केल्याचे पाहावयास मिळते. त्यातून होणारे नुकसान कसे भरून काढता येईल? असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: अकोला : चार तासांच्या कार्यक्रमाचा खर्च नऊ लाख रुपये

चिक्कोडी तालुक्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सर्वत्र जोमाने सुरू झाला आहे. तालुक्यातील विविध गावात उसाची तोड होत आहे. सकाळपासूनच तोडणी, ओढणी करण्यासाठी कामगारांची लगबग सुरू असते. ट्रॅक्टर चालक जलदगतीने कारखान्यांना ऊस पोहोचविण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करतात. मात्र या गडबडीत विविध ठिकाणी उसाच्या पडणाऱ्या मोळ्या शेतकऱ्यांचे नुकसान करणारे ठरते. ग्रामीण भागातील ऊस ट्रॉलीतून बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक होत आहे. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटनाही घडत आहेत. अनेकदा ट्रॅक्टरचालक मोठ्या आवाजात गाणी ऐकत वाहने हाकतात.

याशिवाय ट्रॉलीला रिफ्लेक्टर न बसविलेल्या वाहनांचा धोका रात्री प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना संभवतो. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दरवर्षी अशा पद्धतीने होणाऱ्या उसाचे नुकसान कित्येक टन होते. मात्र या नुकसानीची कोणाला काहीच देणे घेणे नाही. खते, मजुरी, वाहतूक खर्चाचा विचार केल्यास प्रति टन मिळणारा ऊसाचा भाव काटमारी याचे गणित जुळत नाही.

हेही वाचा: अकोला : पीक विम्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

शेतकऱ्यांचा समोरील संकटांची मालिका अद्यापही संपलेली नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्याने पिकविलेल्या या पिकाला अद्यापही रास्त भाव मिळालेला नाही. उसापासून तयार होणारी साखर व अन्य उत्पादनाला चांगला भाव मिळत आहे. मात्र त्याच उत्पादनासाठी लागणारा कच्चामाल रस्त्यावर बेफिकीरपणे टाकला जातो, याचे गांभीर्य चालकांना कधी येणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

`सुरवातीपासून ऊस लागवड करण्यास येणाऱ्या खर्च, बारा ते तेरा महिने राहणारा ऊस त्यानंतर कारखान्यास ऊस पाठविलेल्या बिलाची प्रतीक्षा. या कालावधीत शेतकऱ्यांना खूप काही सोसावे लागते. ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे होणारे नुकसान कोण सोसणार याकडे, लक्ष देणे गरजेचे आहे`.

-नितीन पाटील, शेतकरी, मलिकवाड

loading image
go to top