सुखद ! निराधार आजीला मिळाले घर, अन् नात..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

कुटुंब छोटं होतंय. मात्र कुटुंबाची गरज मात्र संपलेली नाही. अशा काळात समाजातील असे नात्याचे नवे बंध तयार व्हायला हवेत. आजीच्या मायेच्या बंधामुळे वैष्णवी आपलं उच्चशिक्षण पूर्ण करेल. वृध्दाश्रम नसतील असा समाज आदर्श मानला पाहिजे. त्यांना पर्याय असे नातेबंध असतील.
- डॉ. नरेंद्र मंद्रुपकर,  प्रवीण महाराज

इस्लामपूर ( सांगली ) - रक्तातील नात्यापेक्षा कधी कधी मानलेली..जोडलेली नाती मायेचा ओलावा देतात. नियतीच्या फटक्‍यांनी हतबल झालेल्या निराधार चिमुरडी आणि वृद्धेच्या आयुष्यात हा नव्याने मायेची पालवी फुटली आहे. त्यासाठी येथील आपली माणसं फाऊंडेशनने पुढाकार घेत हा मायेचा बंध जोडला आहे. त्यातून त्या चिमुरडीच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त आणि सुलभ झाला आणि त्याचवेळी वृद्धेला वृद्धाश्रमाऐवजी स्वतःच घर मिळालं. 

त्याची कथा अशी - परभणी जिल्ह्यातील वैष्णवी शिंदे ही ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलगी. कुटुंबाच्या पाचवीला पूजलेल्या भटकंतीतूनही तीनं आजवर नववीपर्यंतचं शिक्षण मोठ्या जिद्दीनं घेतलंय. आता ती दहावीत येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिकतेय. हे कुटुंब इस्लामपूरपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील वाळवा रस्त्यालगतच्या शेतात झोपडीत राहते.

पोलिस कर्मचाऱ्याचे सहकार्य

वैष्णवी, तिचा भाऊ करण आणि अशिक्षित आई असे तिघे या झोपडीत राहतात. आठ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांच निधन झालं. वैष्णवीची दररोजची आठ-दहा किलोमीटरची पायपीट निर्भया पथकातील पोलिस कर्मचारी संपत वारके यांना दिसली. त्यांनी आपली माणसं फाऊंडेशनच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर वैष्णवीची शिक्षणाची धडपड मांडली. वैष्णवीची दररोजची पायपीट कमी करण्यासाठी दोन सायकली दाखल झाल्या. आता ती सायकलवरून शाळेला ये-जा करू लागली. मात्र तेही त्रासाचे होते.

हेही वाचा -  PHOTOS : प्री-वेडिंग शूटचे हॉट डेस्टिनेशन म्हणून ही ठिकाणे येताहेत नावारूपास 

निराधर आजीला मिळाले घर

दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथील वृद्ध महिलेची जगण्याची तडफड ‘आपली माणसं ’ फाऊंडेशनच्या निदर्शनास आली. ८७ वर्षांची ही आजी निराधार. पती निधनानंतर त्या ज्या भावाकडे रहायच्या त्याचंही  निधन झालं. तुटपुंज्या पेन्शनवर जगणं अवघड झालं होतं. त्या इस्लामपुरात एका भाड्याच्या खोलीत रहायला आल्या. आता आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी राहण्याऐवजी त्यांनी वृद्धाश्रमात जावं असं ठरवलं. फाऊंडेशनच्या सदस्यांनी दोन्ही घटनांमधील गरजेचा बंद ओळखला आणि या दोघी एकत्र राहिल्या तर असा विचार केला आणि प्रत्यक्षातही आणला. वैष्णवीच्या शाळेचे मुख्याध्यापक डॉ. नरेंद्र मंद्रुपकर यांनी  वैष्णवी, तिची आई, निराधार आजी यांची बैठक घेऊन तसा प्रस्ताव मांडला. सर्वांनीच यावर संमती दर्शवली. वैष्णवीला आजी आणि आजीला नात वैष्णवी मिळाली. मायेचा एक बंध तयार झाला. तो नात्यांपेक्षा महत्त्वाचा ठरला. यासाठी ग्रुपचे सदस्य दीपक साळुंखे, अशोक शिंदे, संदीप कोठारी, प्रवीण महाराज यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले.

हेही वाचा - परीक्षेला एकत्र जाऊया म्हणाले, अन्...
 

नातेबंध हा पर्याय

कुटुंब छोटं होतंय. मात्र कुटुंबाची गरज मात्र संपलेली नाही. अशा काळात समाजातील असे नात्याचे नवे बंध तयार व्हायला हवेत. आजीच्या मायेच्या बंधामुळे वैष्णवी आपलं उच्चशिक्षण पूर्ण करेल. वृध्दाश्रम नसतील असा समाज आदर्श मानला पाहिजे. त्यांना पर्याय असे नातेबंध असतील.
- डॉ. नरेंद्र मंद्रुपकर,  प्रवीण महाराज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homeless Grandmother Got Home And Granddaughter